जिल्ह्यातून मागील वर्षीच्या अडीचपट नोंदणी
प्रतिनिधी / सातारा
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत इ.६ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सन २००९-२०१० पासून इन्स्पायर अवॉर्ड या योजेनेचे आयोजन केले जाते. यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येक शाळेतील उत्कृष्ट संकल्पनेवर आधारित जास्तीत जास्त पाच मॉडेल्सची नोंदणी करता येते. यासाठी विद्यार्थ्यांकडून नामांकन मागविण्यात आले होते.
कोरोनाच्या संकट काळात शाळा बंद असतानाही कोल्हापूर विभागाने नामांकनामध्ये राज्यात व्दितीय क्रमांक मिळविला
आहे. विशेष म्हणजे जिल्हा निहाय आकडेवारीत विभागात सातारा प्रथम तर कोल्हापूर दुस-या स्थानावर आहे.
जिल्हा निहाय नामांकन
सातारा – २२०३
कोल्हापूर – १७२२
सांगली १६९७
रत्नागिरी – ८३३
सिंधुदुर्ग – १७१
यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे अजूनही शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नामांकन करणे, ही बाब शिक्षण विभागाला तशी अवघडच होती. परंतु हे आव्हान स्विकारुन जिल्ह्यातील तब्बल २२०३ विद्यार्थ्यांचे नामांकन करण्यात शिक्षण विभागाला यश आलेले आहे. मागील वर्षी केवळ ९०० विद्यार्थ्यांचे नामांकन झालेले असताना या वर्षी मात्र तोच आकडा अडीच पटीने वाढलेला आहे. त्यासाठी झुम अॅप व्दारे वेळोवेळी घेण्यात आलेल्या बैठकांचा फायदा झाला. राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक रविंद्र रमतकर यांनी सुध्दा शिक्षकांना त्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
९ऑक्टोंबर २०२० रोजी फेसबुक लाईव्ह व्दारे इन्स्पायर अवॉर्ड योजनेमधून राष्ट्रीय स्तरावर विजेते झालेल्या अनुजलोणकर, पुणे, सईदा उरुज, मंड्या, कर्नाटक, सिध्दार्थ कुशवाह, प्रयागराज, उत्तरप्रदेश, आर्यन माळी, सांगली, आशिषराऊत, अहमदनगर या पाच विद्यार्थ्यांमार्फत मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नामांकन करताना शिक्षकांना ब-याच अडचणी येत होत्या. त्या अडचणी सोडविण्यासाठी श्री कोटेश्वर विद्यालय गोवे ता. सातारा या विद्यालयातील गणित विषयाचे टेक्नोसेव्ही शिक्षक लक्ष्मण उबाळे यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन त्यांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यास मदत केली.