जिह्यातून मागील वर्षीच्या अडीचपट नोंदणी
प्रतिनिधी / सातारा
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत इ.6 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सन 2009-2010पासून इन्स्पायर अवॉर्ड या योजेनेचे आयोजन केले जाते. यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येक शाळेतील उत्कृष्ट संकल्पनेवर आधारित जास्तीत जास्त पाच मॉडेल्सची नोंदणी करता येते. यासाठी विद्यार्थ्यांकडून नामांकन मागविण्यात आले होते.
कोरोनाच्या संकट काळात शाळा बंद असतानाही कोल्हापूर विभागाने नामांकनामध्ये राज्यात व्दितीय क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे जिल्हा निहाय आकडेवारीत विभागात सातारा प्रथम तर कोल्हापूर दुस-या स्थानावर आहे.
जिल्हा निहाय नामांकन
सातारा – 2203
कोल्हापूर – 1722
सांगली 1697
रत्नागिरी – 833
सिंधुदुर्ग – 171
केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि ऱघ्इ (Natinal Innovation Foundation, Gandhinagar, Gujrat, India) यांच्या मार्फत इन्स्पायर अवॉर्ड योजनेचे आयोजन केले जाते. इ.6 वी ते 10 वी च्या वर्गातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करुन, शोध आणि विकास यांची सांगड घालून, त्यांच्याकल्पना शक्तीला वाव देऊन, समाजोपयोगी साधन निर्मिती करुन, दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यास
प्रेरणा देणे, हे इन्स्पायर अवॉर्ड योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत सामाजिक जागरुकता आणि
गरजपूर्ती करणा-या विद्यार्थ्यांच्या एक लाख विचारांची राष्ट्रीय स्तरावर निवड केली जाते. ऱघ्इ मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तित बँक खात्यात रु.10000/- जमा केले जातात.
यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे अजूनही शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नामांकन करणे, ही बाब शिक्षण विभागाला तशी अवघडच होती. परंतु हे आव्हान स्विकारुन जिह्यातील तब्बल 2203 विद्यार्थ्यांचे नामांकन
करण्यात शिक्षण विभागाला यश आलेले आहे. मागील वर्षी केवळ 900 विद्यार्थ्यांचे नामांकन झालेले असताना या वर्षी मात्र तोच आकडा अडीच पटीने वाढलेला आहे. त्यासाठी झुम ऍप व्दारे वेळोवेळी घेण्यात आलेल्या बैठकांचा फायदाझाला. राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक रविंद्र रमतकर यांनी सुध्दा शिक्षकांना त्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
9ऑक्टोंबर 2020 रोजी फेसबुक लाईव्ह व्दारे इन्स्पायर अवॉर्ड योजनेमधून राष्ट्रीय स्तरावर विजेते झालेल्या अनुजलोणकर, पुणे, सईदा उरुज, मंडय़ा, कर्नाटक, सिध्दार्थ कुशवाह, प्रयागराज, उत्तरप्रदेश, आर्यन माळी, सांगली, आशिषराऊत, अहमदनगर या पाच विद्यार्थ्यांमार्फत मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नामांकन करताना शिक्षकांना ब-याच अडचणी येत होत्या. त्या अडचणी सोडविण्यासाठी श्री कोटेश्वर विद्यालय गोवे ता.सातारा या विद्यालयातील गणित विषयाचे टेक्नोसेव्ही शिक्षक लक्ष्मण उबाळे यांनी
जिह्यातील शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन त्यांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यास मदत केली. तसेच शाळांना
युजर आयडी व पासवर्ड जिल्हा स्तरावरुन मिळवून दिले, विद्यार्थ्यांच्या बँक पासबुक वरुन त्यांची माहिती कशी भरावी, व्हिडीओ किंवा प्रकल्पांचे फोटो, कल्पनांची माहिती, उपकरण टायटल इ. बाबी इंग्रजी मधून कशा
भराव्यात, तसेच इतर येणा-या तांत्रिक अडचणी रात्री उशिरापर्यंत सोडविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्याचाही
फायदा नामांकन संख्या वाढण्यास झाला.
शाळा बंद असतानाही प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षिका, टेक्नोसेव्ही शिक्षक व विज्ञान शिक्षक यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. या संदर्भात वेळोवेळी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक यांच्या झुम ऍप व्दारे बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यांच्या तांत्रिक अडचणी
विशेष मार्गदर्शनाव्दारे सोडविण्यात आल्या होत्या. वेळोवेळी तालुका निहाय नामांकनांची आकडेवारी काढून आढावा घेतला जात होता.
“सर्वांच्या परिश्रमामुळेच इन्स्पायरच्या नामांकनामध्ये सातारा जिल्हा राज्यात तीन क्रमांकावर तर कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे.
कोल्हापूर विभागाची आकडेवारी बघितल्यास सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. कोल्हापूर दुस-या क्रमांकावर, सांगली तिस-या क्रमांकावर, रत्नागिरी चौथ्या क्रमांकावर तर सिंधुदुर्ग पाचव्या क्रमांकावर आहे. जिह्यातील सर्व मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे सातारा जिह्याने इन्स्पायर अवॉर्ड मध्ये 2203 विद्यार्थ्यांची नोंदणी करुन नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे.”
राजेश क्षीरसागर,माध्यमिक शिक्षणाधिकारी