प्रतिनिधी/इस्लामपूर
इस्लामपूर- बहे रस्त्यावर एमआयडीसी परिसरात दोन दुचाकींची समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात वाळवा तालुक्यातील वशी येथील तरूण जागीच ठार झाला. त्याची पत्नी दर्शना जखमी झाली. त्याची सासुरवाडी इस्लामपूर असून बहे रामलिंग बेटावरुन परत येताना आज, मंगळवारी रात्री हा अपघात झाला. संतोष शिवाजी थोरात (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा एक महिन्या पुर्वी विवाह झाला होता. दरम्यान काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
थोरात हा इचलकरंजी येथे नोकरीस होता, असे समजते. तो पत्नी दर्शना सह बहे येथील रामलिंग बेटावर देवदर्शनासाठी गेला होता. तिथून तो पत्नीसह मोटारसायकल क्रमांक (एमएच -०९ २७२९) वरून परत येत होता. एमआयडीसी दरम्यान आल्या नंतर समोरुन सिध्दांत संग्राम पाटील (२०) हा तरूण मोटरसायकल क्रमांक (एमएच-१०-३९२९) वरून येत होता. त्यांची समोरा समोर धडक झाली. यामध्ये थोरात याच्या डोक्यास मार लागल्याने तो जागीच ठार झाला.तर पत्नी दर्शना जखमी झाली. या अपघातात पाटील हा देखील गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत फिर्याद देण्याचे काम सूरू होते.