प्रतिनिधी / इस्लामपूर
ईश्वरपूर नामकरणासाठी दि.२७ डिसेंबर रोजी नगरपालिकेची सभा होणार आहे. या सभेस राष्ट्रवादी व विकास आघाडीच्या नगरसेवकांनी उपस्थित रहावे, यासाठी त्यांच्या घरी जाऊन शिवसेना जिल्हाप्रमुख व शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांनी शहरातील ४० हजार शहरवासीयांच्या भावना स्वाक्षरी द्वारे आपल्यापर्यंत पोहचल्या आहेत. त्या भावनांचा आदर करत आपण राजकीय श्रेयवाद, जातिभेद बाजूला ठेवून सभागृहात एकत्र येऊन एकमुखाने नामकरणास पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
या विषयावर कोणीही राजकारण करु नये जे काही असेल ते सभागृहाद्वारे शहरवासीयांच्या समोर ठेवा, असे त्यांनी यावेळी सांगितले. ईश्वरपूर नामकरण हे कोणत्याही जाती धर्माचा विषय नाही. कारण ईश्वर’ हा सर्वाचाच आहे. तो कोणाचा गॉड आहे. कोणाचे हजरत पीर साहेब आहेत. कुणाचे अल्लाह आहेत. कुणाचे भगवान आहेत, असे प्रत्येकाचे आहेत. पण ईश्वर हा सगळ्यांचाच आहे. म्हणून सगळ्यांनी मिळून नामकरणास पाठिंबा द्यावा, असे भावनिक आवाहन केल्याचे पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे यांच्यासह विकास आघाडीचे अध्यक्ष व नगरसेवक विक्रम पाटील, अमित ओसवाल, कोमल बनसोडे, अन्नपूर्णा फल्ले, चेतन शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी तालुका प्रमुख सागर मलगुंडे, नगरसेवक आणि शहरप्रमुख शकील सय्यद, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य राहुल टिबे, कमलेश शहा, प्रवीण गायकवाड, अंकुश माने, सचिन पाटील, राजू पठाण, आशपाक जमादार, प्रथमेश काटे उपस्थित होते.