कार्यकारी अभियंत्यांना घेतले फैलावर
प्रतिनिधी/ फोंडा
उच्च दाबाच्या वीज प्रवाहामुळे म्हार्दोळ व मंगेशी भागातील नागरिकांच्या घरातील वीज दिवे व इतर उपकरणे वारंवार निकामी होत असून त्यावर तातडीने उपाययोजना आखण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. कुर्टी येथील वीज खात्याचे कार्यकारी अभियंते दीपक नाईक यांनी या समस्येला ग्राहकांना जबाबदार धरल्याने संतप्त शिष्टमंडळाने त्यांना फैलावर घेतले. कुंडई औद्योगिक वसाहत व म्हार्दोळ मंगेशी भागासाठी दोन वेगवेगळे ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्याची नागरिकांची मागणी आहे.
कुंडई औद्योगिक वसाहतीमध्ये उच्च दाबाच्या वीज पुरवठय़ाची आवश्यकता आहे. मात्र त्याचा फटका मंगेशी व म्हार्दोळ येथील ग्राहकांना बसू लागला आहे. गेल्या सहा महिन्यापासून म्हार्दोळ व मंगेशी भागात उच्च दाबाच्या वीज प्रवाहामुळे अनेक घरातील वीज दिव्यांबरोबरच पंखे, टीव्ही संच व इतर इलेक्ट्रोनिक वस्तू जळाल्या आहेत. गेल्या 12 डिसें. रोजी अशाच प्रकारे अति उच्च दाबामुळे येथील एका घराला आग लागली होती. ही समस्या यापुढे लोकांच्या जीवावर बेतण्याचा संभाव्य धोका आहे. अशी एखादी घटना घडण्यापूर्वीच त्यावर उपाययोजना करावी या मागणीसाठी मंगळवारी नागरिकांचे शिष्टमंडळ कार्यकारी अभियंत्याना भेटायला कुर्टी वीज खात्यात आले होते. मात्र हा दोष वीज खात्याचा नसून त्याला ग्राहक जबाबदार असल्याची भूमिका कार्यकारी अभियंत्यांनी घेतल्यानंतर शिष्टमंडळ आक्रमक बनले. जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, पंचसदस्य ऍड. वरद म्हार्दोळकर, डॉ. घनश्याम म्हार्दोळकर, रवी आमोणकर, संजीव वेरेकर, दिनेश वेलिंगकर व बिपिन मंगेशकर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. गेल्या सहा महिन्यांपासून दिवसाला किमान दह ते पंधरा वेळा वीज पुरवठा खंडित होत असून म्हार्दोळ भागातील पथदीपही पेटत नसल्याचे दामोदर नाईक यांनी प्रसार माध्यमासमोर बोलताना सांगितले. वीज खात्याने उच्च दाबाच्या वीज प्रवाहाची समस्या आटोक्यात न आणल्यास वीज मंत्र्यांपर्यंत हा विषय नेण्याचा इशारा त्यांनी दिला.
डॉ. घनश्याम म्हार्दोळकर यांनी आपल्या घरातील विजेवरील अनेक उपकरणे उच्च दाबाच्या प्रवाहामुळे निकामी झाल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंते त्यावर उपययोजना आखण्याचे सोडून उलट ग्राहकांना जबाबदार धरीत आहेत. कुठल्याही घरात 230 वोल्ट पेक्षा जास्त प्रवाह वीज उपकरणांना मारक ठरतो. मात्र अभियंते 264 वॉल्ट नॉर्मल असल्याचे हास्यास्पद उत्तर देतात. सध्या उच्च दाबामुळे घरातील उपकरणेच निकामी होत असून यापुढे घरात राहणाऱया लोकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. वीज खाते दरवेळी या समस्येमागील कारण शॉर्टसर्कीट असल्याचे सांगते. हे धांदात खोटे असून त्याला खुद्द वीज खातेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. या समस्येवर उपाय म्हणून तातडीने ग्राहकांसाठी व औद्योगिक वसाहतीसाठी वेगवेगळे ट्रान्स्फॉर्मर कार्यान्वित करण्याची मागणी रवी आमोणकर यांनी केली. कार्यकारी अभियंत्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी अधीक्षक अभियंते स्टिफन फर्नांडिस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही समस्या मांडली. त्यांनी यासंबंधी अहवाल मागवून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.