प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनापासून बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, शहरातील विविध भागात नागरिक विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा नागरिकांवर कारवाई करण्याचे सत्र महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. मजगाव क्रॉस, टिळकवाडी, उद्यमबाग मेन रोड अशा विविध भागात ही कारवाई राबविण्यात आली.
विनामास्क फिरणाऱयांवर काही ठराविक भागात कारवाई करण्यात येत होती. मात्र, ही कारवाई संपूर्ण शहरात राबविण्याचा आदेश महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी बजावला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जागृती मोहीम राबविण्याबरोबरच दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहराच्या विविध भागात ही कारवाई सुरू असून बुधवारी शहराच्या दक्षिण भागात ही कारवाई राबविण्यात आली. मजगाव क्रॉस, टिळकवाडी, उद्यमबाग अशा विविध भागात विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारून 4 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला. स्वच्छता निरीक्षक सुधीर ताशिलदार, उत्तम गणाचारी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी ही कारवाई केली.