क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनने एएफसी चॅम्पियन्स लीगसाठी ग्रुप ई गट टप्प्यातील सामन्यांचे आयोजन करण्याचे अधिकार अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला दिले आहेत. त्यानुसार आता हे सामने गोव्यात होतील. एएफसीने 11 मार्च रोजी सहभागी सदस्य महासंघांच्या जनरल सेक्रेटरींना पाठविलेल्या पत्रात याची पुष्ठी केली आहे.
एएफसी चॅम्पियन्स लीगच्या गटात खेळणारा भारताचा एफसी गोवा हा पहिला संघ आहे. एफसी गोवाचा गट ई मध्ये समावेश असून यात 2018 मध्ये एएफसी चॅम्पियन्स लीगमधील उपविजेता इराणच्या पर्सेपोलीस एफसी, कतारचा अल-रय्यान आणि एक प्ले-ऑफचा विजेता संघांचा समावेश असेल. 2019-20 आयएसएल फुटबॉल स्पर्धेत लीग विजेता बनल्याने एफसी गोवाला या स्पर्धेत खेळण्यासाठी थेट पात्रता मिळाली होती.
आशियाई फुटबॉलच्या वतीने एएफसीचे सरचिटणीस विंडरसन जॉन यांनी चॅम्पियन्स क्लब स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन करण्याच्या इच्छेबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे आभार मानले आहेत. आमच्या सर्व प्राथमिकतांमध्ये आम्ही खेळाडूंची आणि अधिकाऱयांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे जॉन यांनी म्हटले आहे. एएफसी स्पर्धा समिती आणि आमच्या व्यावसायिक भागीदारांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि आम्ही सुरक्षित आणि यशस्वी 2021 क्लब फुटबॉल हंगाम सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने आम्ही सर्व भागधारकांच्या हिताचे रक्षण करत राहू, असे विंडरसन जॉन म्हणाले.
एएफसी चॅम्पियन्स क्लब लीगच्या पश्चिम विभागातील सामने 14 ते 30 एप्रिल या कालावधीत होतील. यात रियाधमध्ये गट अ आणि गट ड तसेच जेद्दा येथे गटा क मधील सामने होतील. ब गटातील सामने शारजात होणार असून ई गटातील सामने गोव्यात होतील. एफसी गोवाचे सामने याप्रमाणेः विरूद्ध अल-रय्यान (14 एप्रिल), विरूद्ध अल-वाहदा आणि अल-झवार्रा यांच्यातील विजेता (17 एप्रिल), विरूद्ध पर्सेपोलीस एफसी (20 एप्रिल), विरूद्ध पर्सेपोलीस एफसी (23 एप्रिल), विरूद्ध अल-रय्यान (26 एप्रिल), विरूद्ध अल-वाहदा आणि अल-झावार्रा यांच्यातील विजेता (29 एप्रिल).