दोन महिन्यांनी मुलीला जगासमोर आणले
हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपची पूर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री एम्बर हर्डने मुलीच्या जन्माची माहिती दिली आहे. तिने सरोगसीद्वारे जन्मलेल्या स्वतःच्या पहिल्या अपत्याचे एप्रिलमध्ये स्वागत केले आहे.
एम्बर हर्डने इन्स्टाग्रामवरून स्वतःच्या नवजात मुलीचे छायाचित्र शेअर केले आहे. छायाचित्रात एम्बरने स्वतःच्या मुलीला पोटावर झोपविल्याचे दिसून येते. 4 वर्षांपूर्वी अपत्यासंबंधी निर्णय घेतला होता, मी माझ्या अटींवर मातृत्व अनुभवू इच्छित होते. अपत्यासाठी विवाह करण्याची गरज नसल्याचा माझा विचार होता. माझ्या मुलीचा जन्म 8 एप्रिल रोजी झाला असून तिचे नाव ओनाग पेग हर्ड आहे. ओनाग ही माझ्या उर्वरित आयुष्याची सुरुवात असल्याचे एम्बरने म्हटले आहे.
एम्बरने स्वतःच्या मुलीचे नाव स्वतःच्या आईचे नाव पेगवर ठेवले आहे. पेग यांचे मे 2020 मध्ये निधन झाले होते. एम्बरने हॉलिवूड स्टार जॉनी डेपसोबत विवाह केला होता. त्यांचा विवाह फेब्रुवारी 2015 पासून मे 2016 पर्यंतच टिकला, दोघांचाही घटस्फोट झाला आहे. एम्बरने जॉनीवर अनेक गंभीर आरोप केले होते. एम्बरकडून जॉनी डेपविरोधातील घरगुती हिंसाचाराचा खटला अद्याप सुरू आहे.