युक्रेनला शेकडो उपग्रहांनी करतोय मदत
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धात एलन मस्क यांनी लोकांची मने जिंकली आहेत. स्पेसएक्सचे सीईओ असलेल्या मस्क यांनी युक्रेनच्या मदतीसाठी स्टारलिंक टर्मिनल्स पाठविले असून यामुळे युक्रेनमध्ये उपग्रह आधारित ब्रॉडब्रँड सुविधा मिळत आहे. मस्क यांच्या या पावलाची मोठी प्रशंसा होत आहे. युक्रेनचे उपपंतप्रधान मिखाईलो फेडोरोव्ह यांनी ट्विटरवर मस्क यांच्याकडून मदत मागितली होती, ज्यानंतर मस्क यांनी स्वतःचे टर्मिनल्स युक्रेनमध्ये पाठविले आहेत.
फेडोरोव्ह यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवर ऍडिशनल टर्मिनल्सच्या तुकडीचे छायाचित्र शेअर केले आहे. या टर्मिनल्सचा वापर स्पेसएक्सच्या स्टारलिंग सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी करण्यात येणार आहे. युक्रेनवर रशियायच हल्ल्यानंतर अनेक शहरांमध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी खंडीत झाली होती. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. याप्रकरणी युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी मस्क यांना देशात स्टारलिंक स्टेशन उपलब्ध करण्याची विनंती केली होती.
तुम्ही मंगळावर वसाहत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात आणि रशिया युक्रेनवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. तर तुमची रॉकेट्स अंतराळातून पृथ्वीवर यशस्वीपणे परतत आहेत. रशियाची रॉकेट्स युक्रेनच्या सर्वसामान्य लोकांवर हल्ला करत आहेत असे फेडोरोव्ह यांनी मस्क यांना उद्देशून म्हटले होते. रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा ठप्प आहे.