प्रतिनिधी/उंडाळे :
येणपे (ता. कराड) येथे कराड-येणपे एसटीला भरधाव वेगाने येणाऱया मोटार सायकलची धडक बसून युवक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव अविनाश मोहन सुतार (वय 24) असे आहे. या अपघाताची नोंद उंडाळे पोलीस दूरक्षेत्रात करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास कराडहून एसटी चालक जयसिंग रामचंद्र पाटील हे कराड-येणपे एसटी घेऊन येत असताना शेवाळेवाडी ते येणपे हा रस्ता अरुंद, वळणदार व चढ असलेल्या ठिकाणी समोरून कराडच्या दिशेने युवक मोटारसायकलवरून नोकरीच्या ठिकाणी भरधाव वेगाने निघाला होता. शेवाळेवाडी ते येणपे व येणपे ते गिरजवडे या तिहेरी रस्त्यावर अचानक समोरून एसटी आल्याने मोटारसायकलचा ताबा मिळवत एसटीच्या पाठीमागील बाजूला जोराची धडक बसून अविनाश सुतार जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.
या अपघाताची माहिती मिळताच उंडाळे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, हेड कॉन्स्टेबल डी. बी. राजे, गणेश बाकले, एस. एस. कोळी आदींनी तत्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा करून एसटी चालक जयसिंग पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.