सलग दुसऱया महिन्यात 1 लाख कोटीच्या वर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑगस्ट 2021 या महिन्यात देशाचे वस्तू-सेवा करसंकलन (जीएसटी) 1 लाख 12 हजार कोटी रुपयांचे झाले आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्टपेक्षा ते 30 टक्के जास्त आहे. गेल्या महिन्यातही संकलनाने 1 लाख कोटींचा टप्पा पार केला होता. ही माहिती केंद्रीय करसंकलन विभागाने बुधवारी दिली आहे.
ऑगस्टमध्ये झालेल्या करसंकलनात केंद्रीय कर 20,522 कोटी, राज्य कर 26,605 कोटी तर संयुक्त कर 56,247 कोटी अशी विभागणी आहे. याशिवाय 8,646 कोटींचा अधिभार (सेस) जमा झाला आहे. संयुक्त करसंकलनात 26,884 कोटी रुपयांच्या आयात कराचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच जुलैत हे करसंकलन 1 लाख 16 हजार कोटी इतके झाले होते. त्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात ते काहीसे कमी झाले आहे.
कोरोनाचा पहिला उद्रेक ओसरल्यानंतरच्या 9 महिन्यांच्या कालावधीत करसंकलन प्रत्येक महिन्याला एक लाख कोटींच्या वर झाले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱया उद्रेकात ते पुन्हा काही प्रमाणात घसरले. जुलैमध्ये देशभरात बहुतेक राज्यांमध्ये आर्थिक निर्बंध शिथील करण्यग्नात आले. त्यामुळे करसंकलनातही वाढ झाली. जून 2021 मध्ये करसंकलनात घट झाली होती.
अर्थव्यवस्थेत सुधारणा
जीएसटी करसंकलन वाढणे हे अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे लक्षण आहे. आर्थिक विकासाबरोबच करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने योजलेले प्रभावी उपाय करसंकलन वाढीसाठी कारणीभूत ठरलेले आहेत. बनावट पावत्या तयार करुन कर चुकविणाऱयांच्या विरोधात धडाक्याने कारवाई करण्यात आली आहे. या पुढील महिन्यांमध्येही ही वाढ अशीच सुरु राहील अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.