नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दोनवेळचे ऑलिम्पिक सुवर्णजेते, महान हॉकीपटू केशव दत्त यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले व 1 कन्या असा परिवार असून हे सर्व जण विदेशात स्थायिक आहेत. लाहोरमधील जन्म असलेल्या केशव दत्त भारतीय हॉकीमधील सुवर्णकाळाचे साक्षीदार होते. 1948 ऑलिम्पिकमध्ये भारताने ब्रिटनचा वेम्बले स्टेडियमवर 4-2 फरकाने धुव्वा उडवला, त्या लढतीत केशव दत्त संघात सहभागी होते. 1952 हेलसिंकी ऑलिम्पिक सुवर्णजेत्या संघाचेही ते सदस्य होते. त्यापूर्वी 1947 मध्ये मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली पूर्व आफ्रिका दौऱयातही त्यांचा समावेश होता. याशिवाय, दत्त यांनी 1951 ते 1953 व पुन्हा 1957 व 1958 मध्ये मोहन बागान संघाचे नेतृत्व भूषवले होते.