सांगली / प्रतिनिधी
राज्य शासनाने कंटेनमेंट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा दिनांक 25 ऑक्टोबर पासून सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तसेच कंटेनमेंट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरू करण्यासाठी मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील व्यायामशाळांना मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून दि. 25 पासून सुरू करण्यास परवानगी दिली असून तसे आदेश जारी केले आहेत.
संबंधित व्यायामशाळांकडून मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार त्या त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.