यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली टी-20 आज
कॅनबेरा / वृत्तसंस्था
वनडे क्रिकेटमध्ये पुरेसे पर्याय उपलब्ध नसल्याने प्रचंड झगडावे लागलेला भारतीय संघ आज (दि. 4) यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात आणखी कणखर लढा देण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल, अशी अपेक्षा आहे. वनडे मालिकेत 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला, ते चिंतेचे ठरले असले तरी त्या तुलनेत भारताचा टी-20 संघ अधिक मजबूत आहे. त्या पार्श्वभूमीवर, ही मालिका अधिक चुरशीची ठरु शकते. आजच्या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात होईल.
कोव्हिड-19 च्या संकटाने क्रीडा विश्व ठप्प होण्यापूर्वी संपन्न झालेल्या न्यूझीलंड दौऱयात भारताने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान संघाचा धुव्वा उडवला होता. त्यापासून भारतीय संघाला मनोबल उंचावण्यासाठी प्रेरणा घेता येईल.
पुन्हा फोकस नटराजनवर
वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, टी. नटराजन यांच्यामुळे टी-20 संघातील गोलंदाजी बरीच समतोल होऊ शकते. टी. नटराजनने बुधवारी वनडेत उत्तम पदार्पण केले तर वॉशिंग्टन सुंदरने आरसीबीतर्फे आयपीएल हंगाम गाजवला आहे. विराट कोहलीने त्याचा पॉवर प्ले व मधल्या षटकात उत्तम विनियोग करुन घेतला होता. हार्दिक पंडय़ा अद्याप नियमितपणे गोलंदाजी करत नसल्याने तूर्तास, वनडे संघात भारताकडे रविंद्र जडेजाच्या रुपाने केवळ एकच स्पेशालिस्ट अष्टपैलू उपलब्ध आहे.
वॉशिंग्टन सुंदरमुळे संघ समतोल
टी-20 मध्ये मात्र वॉशिंग्टन सुंदरचा पर्याय उपलब्ध असल्याने भारतीय संघ अधिक समतोल ठरत आला असून स्वतः हार्दिक पंडय़ा देखील 4 षटकांचा कोटा सहज पूर्ण करु शकेल, असा होरा आहे. यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनला येथे टी-20 पदार्पणाची संधी मिळू शकते. यापूर्वी सिडनीत फलंदाजांना पोषक स्थिती होती. पण, येथे कॅनबेरात फिरकीपटू व जलद गोलंदाजांना देखील अनुकूल स्थिती असू शकते. बुमराहच्या साथीने मोहम्मद शमी व दीपक चहर यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याची येथे उत्सुकता असेल.
वनडे मालिकेत प्रचंड महागडा ठरलेल्या यजुवेंद्र चहलचा येथे मुसंडी मारण्याचा प्रयत्न असेल. पण, तरीही दडपण झुगारुन वर्चस्व गाजवण्यात तो कितपत यशस्वी होईल, हे पहावे लागेल. वनडे मालिकेत केएल राहुल पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरला होता. येथे तो शिखर धवनसह आपल्या पसंतीच्या स्थानी, सलामीला उतरण्याची शक्यता आहे. यापूर्वी, न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत त्याने सलामीला फलंदाजी केली होती. आयपीएलमध्ये त्याची कामगिरीही उत्तम राहिली. तोच कित्ता येथेही गिरवण्याची त्याच्याकडून अपेक्षा असेल.
फलंदाजीत कोहलीवर भिस्त
कर्णधार विराट कोहली वनडे मालिकेत उत्तम बहरात राहिला. तीच मालिका आता टी-20 मध्येही कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल. चौथ्या स्थानावरील श्रेयस अय्यर येथेही दमदार डाव साकारण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल. कोहलीने यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे वनडे मालिकेतील शेवटच्या लढतीत विजय संपादन केल्याने आता टी-20 मालिकेत भारतीय संघाचे मनोबल उंचावलेले असू शकते.
यजमानांसमोर दुखापतींची चिंता
वनडे मालिका 2-1 फरकाने जिंकल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियन संघ टी-20 मालिकाही खिशात टाकण्यासाठी प्रयत्नशील असेल. पण, या मोहिमेत त्यांच्यासमोर मुख्य खेळाडूंच्या दुखापतीची बरीच चिंता आहे. स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर धोंडशिरेच्या दुखापतीमुळे यापूर्वीच संघातून बाहेर फेकला गेला असून कर्णधार ऍरॉन फिंचसह मार्नस लाबुशाने सलामीला उतरणार का, हे पहावे लागेल.
मार्कस स्टोईनिस देखील सलामीसाठी आणखी एक उत्तम पर्याय ठरु शकतो. पण, वनडे क्रिकेटमध्ये स्टोईनिसला देखील दुखापतीचा सामना करावा लागला असून तो उपलब्ध असेल का, हे अद्याप निश्चित नाही. बुधवारी संपन्न झालेल्या तिसऱया व शेवटच्या वनडेत विश्रांती देण्यात आलेल्या मिशेल स्टार्कचे येथे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. पॅट कमिन्सला त्याच्यावरील भार कमी करण्यासाठी या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन.
ऑस्ट्रेलिया : ऍरॉन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍस्टॉन ऍगर, ऍलेक्स कॅरे, कॅमेरुन ग्रीन, जोश हॅझलवूड, मोईसेस हेन्रिक्यूज, मार्नस लाबुशाने, ग्लेन मॅक्सवेल, डॅनिएल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, मॅथ्यू वेड, डॅर्सी शॉर्ट, ऍडम झाम्पा.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : दु. 1.40 पासून.
उभय संघातील टी-20 मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / भारतीय प्रमाणवेळ /ठिकाण
4 डिसेंबर / पहिली टी-20 / दु. 1.40 वा./ कॅनबेरा
6 डिसेंबर / दुसरी टी-20 / दु. 1.40 वा. / सिडनी
8 डिसेंबर / तिसरी टी-20 / दु. 1.40 वा. / सिडनी