पाचगणीतील उद्योजकाची तक्रार : दोन महिलांसह तिघांसह गुन्हा
प्रतिनिधी/ सातारा
आंबेघर तर्फ कुडाळ (ता. जावली) येथील महाबळेश्वर फूड प्रॉडक्टसचे मालक रोहिदास ज्ञानदेव राजपुरे (रा. शिवाजीनगर सोसायटी, पाचगणी, ता. महाबळेश्वर) यांना 6 कोटी रुपये कर्ज देण्याचे अमिष दाखवत तसेच बँकेत अधिकारी असल्याचे सांगून 32 लाख रुपयांना गडा घातल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात आदित्य माने, त्याचे वडील ऍड. शंशाक सखाराम माने, त्यांची पत्नी (रा. मानेवाडा, पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्यासह संजय राघू नवले (रा. गोंदवले, ता. माण) व माधवी जवळकर (रा. खंडाळा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहिदास ज्ञानदेव राजपुरे यांना फेब्रुवारी 2017 मध्ये वाई येथील आहोरा न्युट्रीशन्स अँड स्नॅक्स कंपनी लिलावात निघणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांना ही कंपनी लिलावात विकत घेण्यासाठी 6 कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे संजय राघू नवले रा. गोंदवले (ता. माण) यांच्याशी चर्चा झाली. नवले यांनी आदित्य माने, शंशाक माने व माधवी जवळकर हे बँक कर्ज करुन देण्याची कामे करत असल्याचे राजपुरे यांना सांगितले.
राजपुरे यांनी याबाबत माधवी जवळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आदित्य माने हे बँक ऑफ इंडियाचे तीन जिल्हय़ांचे कर्ज वितरण अधिकारी असून त्यांचे वडील ऍड. शंशाक माने बँक ऑफ इंडियाचे कायदेशीर सल्लागार असल्याचे सांगितले. त्यानंतर आदित्य माने याच्याशी संपर्क झाल्यावर त्याने साताऱयातील शाहू क्रीडा संकुलानजिक असलेल्या हॉटेल ऍम्बेसिडर येथे भेटण्यास बोलावले. तिथे माने पितापुत्र, संजय नवले, माधवी जवळकर यांना राजपुरे भेटल्यानंतर माने पितापुत्रांसह माधवी जवळकर यांनी फाईल पाहून 6 कोटी रुपये कर्ज मंजूर करुन देवू असे सांगितले. त्यानंतर या संशयित आरोपींनी राजपुरे यांच्या फॅक्टरी, बंगला याची पाहणीही केली.
त्यानंतर मग या त्रिकुटाने राजपुरे यांचा विश्वास संपादन करुन त्यांना कर्ज मंजूर झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर बँक अधिकारी, प्रोसेसिंग फी याच्या नावाखाली पैसे मागण्यास सुरुवात केली. कर्जासाठी राजपुरे यांनी देखील नातेवाईक तसेच स्वःताजवळील, मित्रांकडून असे करत फेब्रुवारी 2017 ते 2018 या कालावधीत 32 लाख रुपये एवढी रक्कम कधी रोख, कधी आरटीजीएस प्रणालीद्वारे या त्रिकुटाला दिली. त्यानंतर ते कर्जाची रक्कम मिळण्याची वाट पाहू लागले. मात्र त्यांना कर्ज रक्कम मिळाली नाही. शेवटी पैसे देवूनही कर्ज मिळत नसल्याने त्यांनी आदित्य माने व शंशाक माने यांच्याकडे पैशाचा तगादा सुरु केल्यावर त्यांनी राजपुरे यांना दमदाटी व टाळाटाळ सुरु केली. त्यानंतर एकदा 32 लाख रुपये परत करण्याबाबत नोटरी करारनामा करुन दिला व राजपुरे यांच्या खात्यावर 25 हजार रुपये जमा केले. मात्र उर्वरित 31 लाख 75 हजार रक्कम देण्यास ते टाळाटाळ करु लागले तसेच संशयित आरोपी धमकी देवू लागल्याने त्यांनी शुक्रवारी शाहुपुरी पोलीस ठाण्यात या संशयित आरोपींविरुध्द त्यांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी आदित्य माने, शंशांक माने, त्यांची पत्नी, माधवी जवळकर व संजय नवले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.