पी.चिदंबरम यांचा काँग्रेस प्रमुख कार्यकर्त्यांना संदेश : प्रतापसिंह राणे, रवी नाईक यांनी घेतली भेट
प्रतिनिधी /पणजी
सर्व काँग्रेस पक्षजनांनी संघटित व्हावे, असा संदेश काँग्रेसचे गोवा निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी पक्षाचे पदाधिकारी, आमदार व प्रमुख कार्यकर्ते यांना दिला असून त्यांनी काल बुधवारी दिवसभरात उत्तर गोव्यातील पक्षनेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच स्थानिक राजकारणाबाबत विचारपूस केली.
दोनापावला येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये त्यांनी मुक्काम केला असून तेथेच विविध बैठकांचे सत्र सुरू आहे. काल ते उत्तर गोव्यातील पक्षनेते, पदाधिकारी यांना भेटले तर आज गुरुवारी ते दक्षिण गोव्यातील पक्षनेते, पदाधिकारी यांच्याशी विविध बैठकांच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत.
काल प्रतापसिंह राणे, रवी नाईकही चिदंबरम यांना भेटले.
आगामी विधानसभा निवडणूक व त्यातील उमेदवारी, इतर पक्षांशी युती अशा विविध विषयांवर त्यांनी चर्चा सुरू केली असून कोण चांगला, कोण वाईट याचीही चाचपणी ते करीत आहेत. युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल व इतर संलग्न विभागांच्या विविध पदाधिकाऱयांशी त्यांनी चर्चा केली.
महत्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता
चिदंबरम काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता असून गोव्यातून माघारी जाताना तो निर्णय ते जाहीर करतील, असे पक्षीय सुत्रांनी सांगितले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर व गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव हे त्यावेळी जातीने हजर होते.
दिनेश गुंडू राव यांचा भाजपवर हल्लाबोल
गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत दिनेश गुंडू राव यांनी खाणबंदीचा विषय काढून सावंत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेते खाण घोटाळय़ात नाहीत. ते जर असते तर भाजपने त्यांच्यामागे चौकशी तसेच केंद्रीय तपास एजन्सीचा ससेमिरा लावला असता. भाजपने फक्त आरोप केले. त्या पक्षाने काँग्रेस नेत्यांबाबत पुरावे द्यावेत. त्या पक्षाकडे, सरकारकडे पुरावे नाहीत, असेही राव म्हणाले. रु. 35000 कोटींचा घोटाळा झाल्याचा बीएसीचा अहवाल असल्याचे पर्रीकरांनी सांगितले होते. तो अहवाल जाहीर करा, अशी मागणी राव यांनी केली तसेच काँग्रेस नेते खाण घोटाळय़ात असल्याचे सिद्ध करा, असे आव्हान दिले. दिगंबर कामत, गिरीश चोडणकर यांचीही भाषणे झाली.
संतप्त सांखळी गट काँग्रेसने चिदंबरमकडे केली तक्रार
साखळीतील काँग्रेस कार्यालय उद्घाटन प्रश्नावरून काँग्रेस पक्षात आता संघर्ष सुरू झाला असून साखळी गट काँग्रेसच्या काही पदाधिकाऱयांसह इच्छुक उमेदवारांनी बुधवारी सायंकाळी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. गेल्या रविवारी कुडणे येथे महादेव खांडेकर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे उपस्थित होते. तत्पूर्वी साखळी गट समितीचे अध्यक्ष मंगलदास नाईक आणि सचिव या दोघांनी मिळून दिगंबर कामत व गिरीश चोडणकर यांना या कार्यालयाच्या उद्घाटनाला येऊ नका, जोपर्यंत आमचा उमेदवार ठरत नाही. तरीही दोन्ही नेते उद्घाटनला उपस्थित होते. आश्चर्याची बाब म्हणजे संपूर्ण गट समितीने उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला होता.
या समितीच्या काही पदाधिकाऱयांनी अर्थात गट सचिव खेमलो सावंत आणि संभाव्य उमेदवार यादीमधील धर्मेश सगलानी, प्रताप गावस तसेच श्रीमती सुनीता वेरेकर इत्यादींनी तसेच प्रवीण ब्लेगन या सर्वांनी मिळून चिदंबरम यांची पणजीत भेट घेतली. उमेदवारीबाबत काय तो निर्णय घ्या आणि पुन्हा असा प्रकार होऊ नये, अशी विनंती केली. चिदंबरम यांनी आम्ही उमेदवारी अद्याप कोणाला दिलेली नाही. त्यामुळे निश्चिंत राहावे असे सांगितले. मात्र या गडबडीत दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर हे एकतर्फी रडीचा डाव खेळतात, असे या समितीने उघड केले.