अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळावर सोमवार सकाळपासूनच स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. जुलमी राजवटीपासून वाचण्यासाठी हजारोंच्या संख्येत लोक देशाबाहेर जाण्यासाठी धडपड करत होते. पण तेथे झालेल्या गोळीबारात किमान 5 जण मारले गेले आहेत. काबूल विमानतळावरील स्थिती अत्यंत भयावह आहे. काबूल विमानतळावरील धावपट्टी रिकामी करविण्याचा एक व्हिडिओ पत्रकार नताली अमिरी यांनी शेअर केला आहे. धावपट्टी रिकामी करविण्यासाठी सातत्याने हेलिकॉप्टर्सचे उड्डण होत आहे, यामुळे लोकांना धावपट्टीवरून दूर रहावे लागत आहे. विमानतळावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी गोळीबारही करावा लागला आहे. विमानतळावर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती.
याचदरम्यान अत्यंत वेदनादायी व्हिडिओ समोर आला असून तो प्रत्येकाच्या मनाला हादरवून टाकणारा आहे. काही जणांनी स्वतःला विमानाच्या खालील हिस्स्यावर (चाकानजीकच्या) बांधून घेतले होते. काबूलमधून बाहेर पडू या आशेत असलेले लोक विमानाने उड्डाण करताच आकाशातून खाली कोसळले आहेत.
काबूलवर तालिबानच्या कब्जानंतर लोक अफगाणिस्तानातून बाहेर पडत आहेत. काबूल विमानतळावर हजारोंची गर्दी झाली आहे. स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने विमानोड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. विमानतळाच्या दिशेने येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. अमेरिकेचे सैनिक स्वतःच्या देशाच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तैनात आहेत.