तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
गावातील विद्युत रोहित्रावर चढून दुरुस्तेचे काम करणाऱ्या तरुणाचा विजेचा धक्काने मृत्यू झाला. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. विद्युत विभागाशी संबंध नसलेल्या तरुणाला रोहित्रावर दुरुस्तीसाठी चढविले कसे असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
महादेव शिवानंद तोरकडे (वय 22, रा. मुस्ती, ता. द. सोलापूर) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. महादेव हे गावातील दिवे सुरू व बंद करण्याचे काम करत होते. तसेच पाणी सोडण्याचीही त्यांच्यावर जबाबदारी होती. रविवारी रोहित्रात काही बिघाड झाला होता. यामुळे परिसरातील विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला होता. तांदूळवाडी सबस्टेशन अंतर्गत मुस्ती गावाचा विद्युत पुरवठा होतो. रविवारी गुरव म्हणून ऑपरेटर तर शिंदे हे वायरमन म्हणून काम पाहत होते. शिंदे यांनी महादेव यांना दुरुस्तीसाठी बोलावले होते. त्यासाठी महादेव यांना रोहित्रावर चढण्यास भाग पाडले. परंतु दुरुस्तीवेळी विद्युत पुरवठा सुरूच होता. त्यावर शिंदे यांनी परमिट मागितले नसल्याचा गुरव हे दावा करत आहेत, तर शिंदे हे मोबाईलवरून परमिट घेतल्याचे सांगत आहेत, अशी माहिती महादेवचे मामा शिवशंकर मेरु यांनी दिली. सोमवारी दुपारनंतर गावातील स्मशानभूमीत महादेव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महादेव यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.