तीन संशयितांना बेळगावात अटक : 15 लाखाहून अधिक किमंतीचा ऐवज जप्त,पणजी पोलिसांची यशस्वी कामगिरी
प्रतिनिधी /पणजी
पार्क करुन ठेवलेल्या कारचे आरसे फोडून त्यातील किमती सामान पळविणाऱया आंतरराज्य टोळीचा पणजी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गोवा व महाराष्ट्राच्या अनेक भागांत कारचे आरसे फोडून कारमधील साऊंड सिस्टम किंवा अन्य पार्टस् लंपास करणाऱया सराईत तीन चोरटय़ांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 15 लाखांहून अधिक किमंतीच्या ऐवजासह, मोबाईल, एक कार तसेच रोख रक्कमही जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये जुबेर राहीस अहमद (31), जगन्नाथ रामनाथ सरोज (46) दोघेही मुळ उत्तर प्रदेश येथील असून ते मुंबईत राहत होते. प्रदीप रवळनाथ गुरव (27) हा चंदगड, जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र येथील आहे. तिघेही संशयित ठराविक काळात गोव्यात यायचे व चोरी करायचे. त्यांच्याकडून कारमधील साऊंड सिस्टमचे 16 संच, एक हुंडाई आय 10 कार, मोबाईल तसेच अन्य ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पणजी पोलिसांची यशस्वी कामगिरी
संशयितांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात धुमाकुळ घातला होता. पणजी, म्हापसा, पर्वरी, व अन्य विविध पोलीस स्थानकांच्या हद्दीत कित्येक गाडय़ांचे आरसे फोडून लाखो रुपये किमंतीचा ऐवज लंपास केला होता. कारफोडीच्या नियमित घडणाऱया प्रकारांमुळे पोलिसांची झोप उडाली होती. पणजी पोलीस स्थानकात कारफोडीची तक्रार नोंद होताच पणजी पोलीस स्थानकाच्या एलआयबी टीमने कसून तपासकामाला सुरुवात केली होती. तीन संशयितांना अटक करून तब्बल 17 तक्रारींचा तपास लावण्यात पणजी पोलीस यशस्वी ठरले आहेत.
मोबाईलच्या लोकेशनमुळे शोध सुरु
अटक केलेल्या तीन संशयितांपैकी जुबेर याला दोन वर्षापूर्वी पणजी पोलिसांनी अटक केली होती. कारफोडीच्या प्रकरणातील संशयितांचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी पोलिसांनी जुबेरची माहिती तपासायला सुरुवात केली होती. त्यात एक मोबाईल नंबर मिळाला होता. पोलिसांनी त्या मोबाईल नंबरचे लोकेशन तपासले असता पोलिसांना लोकेशन गोव्यात मिळाले होते. त्यामुळे जुबेर गोव्यात असल्यास गेल्या काही दिवसांपासून कारफोडीचे जे प्रकार होत आहेत त्यात जुबेरचा हात असण्याची शक्यता आहे असा अंदाज पोलिसांनी केला आणि जुबेरचा शोध घेणे सुरु केले.
दोनापावलाहून सुरु झालेला खेळ बेळगावात संपला
शनिवार दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी पोलिसांना मिळालेला मोबाईल नंबर दोनापावला येथे असल्याचे लोकेशन मिळाले होते. त्याचा शोध घेईपर्यंत दुपारी तो दोडामार्ग (महाराष्ट्र) येथे गेल्याचे त्याच्या लोकेशनवरून कळले. पोलीस त्याला पकडायला जाणार तोच तो चंदगड येथे पोचल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अखेर बेळगाव पोलिसांच्या सहाय्याने त्याला व त्याच्या दोन्ही साथीदारांना बेळगावात अटक करण्यात आली.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना व उपविभागीय अधिकारी पणजी संतोष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अजित उमर्ये, साहिल वारंग, अल्लाउद्दीन खान, हवालदार नितीन गावकर, चंद्रशेखर आमोणकर, हरीष पालेकर, सागर नाईक, विष्णू राणे, कॉन्स्टेबल सदानंद मळीक, इमरय्या गुरय्या, कयेश उस्कईकर, आदित्य म्हार्दोळकर, बाप्तीस मास्कारेन्हस, रामा घाडी, सुरेश पाटील, आसिफ कलगुरु, विनोद कांबळी, यांनी ही कारवाई केली असून पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.