प्रतिनिधी/ कारवार
जिल्हय़ात रविवारी दुसऱया टप्प्यात ग्राम पंचायतींसाठी किरकोळ घटनांचा अपवाद वगळता शांत आणि सुरळीत वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. घाटमाथ्यावरील जोयडा, दांडेली, हल्याळ, यल्लापूर, मुंदगोड, शिरसी आणि सिद्धापूर तालुक्यातील 126 ग्रा. पं. च्या 1282 पैकी 1203 जागांसाठी मतदान झाले. 77 जागांसाठी बिनविरोध निवड झाली आहे, तर 2 जगांसाठी निवडणूक झालेली नाही. सात तालुक्यात सरासरी 80.54 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची सरासरी 81.46 तर महिला मतदारांची 79.67 टक्के राहिली. सात तालुक्यांमध्ये सर्वाधिक टक्केवारी 84.64 हल्याळ तालुक्यात तर सर्वात कमी 75.23 टक्के दांडेली तालुक्यात राहिली. शिरसी तालुक्यात 77.75 टक्के, सिद्धापूर तालुक्यात 82.27 टक्के, यल्लापूर तालुक्यात 80.87 टक्के, मुंदगोड 83.99 आणि जोयडा तालुक्यात 76.32 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सात तालुक्यातील एकूण 3 लाख 92 हजार 779 मतदारांपैकी 3 लाख 16 हजार 518 मतदारांनी मतदानाचा हक्क 664 मतदान केंद्रांवर बजावला. यापैकी पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 63 हजार 441, महिला मतदारांची संख्या 1 लाख 53 हजार 75 तर अन्य मतदारांची संख्या 2 इतकी राहिली. या निवडणुकीद्वारे एकूण 3 हजार 452 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीद्वारे जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे, खासदार अनंतकुमार हेगडे, एमएलसी श्रीकांत घोटणेकर, माजी आमदार सुनील हेगडे, संतोष लाड आणि देशपांडे यांचे पुत्र प्रशांत देशपांडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.