वॉशिंग्टन
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन 20 जानेवारी रोजी शपथग्रहण करणार आहेत. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प आणखीन 8 दिवस अध्यक्ष राहणार आहेत. परंतु अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने सोमवारी रात्री स्वतःच्या संकेतस्थळावर ट्रम्प यांचा कार्यकाळ संपल्याचे नमूद केले होते. काही वेळातच ही पोस्ट हटविण्यात आली. विशेष बाब म्हणजे विदेश मंत्रालयाने यावर कुठलेच स्पष्टीकरण दिलेले नाही. व्हाइट हाउसनेही याप्रकरणी मौन साधले आहे. विदेश मंत्रालयाने सोमवारी रात्री 7.49 वाजता (स्थानिक प्रमाणवेळ) संकेतस्थळावर संदेश प्रसारित केला. यात स्पष्टपणे डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याचे नमूद होते. काही क्षणातच हा संदेश मोठय़ा प्रमाणावर प्रसारित झाला आहे.