कदंब अध्यक्ष उल्हास तुयेकर यांचे कुंकळ्ळी भेटीवेळी आश्वासन : महिन्याभरात कामे पूर्ण करू
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
कुंकळ्ळीत यापुढे प्रवाशांना कदंब बसस्थानकावर आवश्यक सुविधा लाभतील व कसल्याही समस्यांना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवणार नाही याची काळजी घेऊ. महिन्याभरात येथील कामे पूर्ण करून घेतली जातील, असे कदंब महामंडळाचे अध्यक्ष असलेले नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी स्पष्ट केले आहे. कुंकळ्ळीत माजी आमदार क्लाफासियो डायस यांनी तुयेकर यांना निमंत्रित केले होते.
यावेळी डायस यानी कुंकळ्ळीत आपण केलेल्या विकासकामांचा थोडक्यात आढावा घेतला तसेच कुंकळ्ळीतील कदंब बसस्थानकासंबंधी माहिती दिली. गेल्या ऑक्टोबरमध्ये आपण अधिकाऱयांसमवेत पाहणी केली होती व तेथे दुरुस्ती आणि आवश्यक कामे पूर्ण करून घेण्यासाठी पाऊल उचलले होते. एवढय़ात कोविडच्या अडचणी व निवडणूक आचारसंहिता लागल्याने ते लांबणीवर पडले, असे डायस म्हणाले. तुयेकर यांनी कुंकळ्ळीतील बसस्थानकावरील कामांकरिता सध्या 65 लाखांची निविदा काढण्यात आली आहे हे निदर्शनास आणून दिले व महिनाभरात ती कामे पूर्ण होतील याकडे लक्ष दिले जाईल, असे सांगितले.
सदर बसस्थानकावरील प्रसाधनगृहे, पाणी आदी समस्यांची कल्पना आली आहे. आवश्यक दुरुस्तीसह प्रवाशांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ. खास करून प्रवाशांना प्रतीक्षा कक्ष उपलब्ध करून देण्यात येईल. महिलांना ते फारच उपयुक्त ठरेल. कर्मचाऱयांनाही विश्रांती कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राहिलेली दुकाने भाडेपट्टीवर देण्यासाठी लवकरच लिलाव पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे येथील काही नागरिकांना व्यवसाय करता येईल, असे तुयेकर यांनी नजरेस आणून दिले.
बसस्थानकावर एकाच व्यक्तीकडे अनेक दुकाने भाडय़ाने देण्यात आली असून जे व्यवसाय स्थानकावर चालविणे वर्ज्य आहेत असे व्यवहार चालले असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी यावेळी केला. काही बसेस स्थानकावर येत नाहीत, तर काही बसेस रस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात येतात, असेही कार्यकर्त्यांनी तुयेकर यांच्या नजरेस आणून दिले. यावेळी कदंब महामंडळच्या मडगाव डेपोचे संचालक गिरीश गावडे उपस्थित होते. त्यांनीही याबाबतीत दुजोरा दिला. काही विषय पोलीस, आरटीओशी निगडीत आहेत याकडे लक्ष वेधण्यात आले. मारियो मोराईस यांनी काही समस्या तुयेकर यांच्या नजरेस आणून दिल्या.
याप्रसंगी भाजप मंडळ अध्यक्ष मारूती देसाई, नगरसेवक विशाल देसाई, रूपा गावकर, पॉलिता कारनेरो आणि इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. कुंकळ्ळीत जरी भाजप आमदार निवडून आला नसला, तरी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर सहकार्य देतील. पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे, असे सांगून डायस यांनी कुंकळ्ळीतील नागरिकांच्या वतीने तुयेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.