ऑनलाईन टीम / मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंधित मुंबईतील 20 ठिकाणांवर NIA ने आज सकाळी छापेमारी केली. डी गँगचे हस्तक, शार्प शूटर, ड्रग्ज पेडलर आणि हवाला ऑपरेटर यांच्याशी निगडीत ही कारवाई करण्यात आली.
भारतात अनेक ठिकाणी छोटा शकील, जावेद चिकना, इकबाल मिर्ची आणि इतर लोकांसोबत दाऊदनं आपलं नेटवर्क उभं केलं आहे. हे लोक व्यावसायिकांना टार्गेट करत होते. भारतातील अनेक देशविरोधी कारवायांमध्येही दाऊदचा सहभाग असल्याची माहिती यापूर्वी NIA ला मिळाली होती. फेब्रुवारीमध्ये यासंदर्भातील नोंद घेण्यात आली होती. तपासाअंती आजपासून या कारवाईला सुरूवात करण्यात आली. मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आणि इतर काही ठिकाणी एनआयएने छापेमारी केली आहे. डी गँगशी अत्यंत जवळचे संबंध असलेले अनेक हवाला ऑपरेटर्स, शार्प शूटर आणि ड्रग्ज पेडलरविरोधात ही कारवाई सुरू आहे.