प्रतिनिधी /कुंकळ्ळी
तलवडा, वेरोडा, कुंकळ्ळी येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानचा वार्षिक कालोत्सव तथा जत्रोत्सवाला शनिवारपासून शुभारंभ झाला. यानिमित्त गर्भागृहातील श्रींची मूर्ती फुलांनी सजविण्यात आली असून शनिवार सकाळपासून भाविकांनी दर्शन घेऊन श्रींचा आशीर्वाद घेतला. शनिवारी रात्री सजविलेल्या अष्टदिकपाल उत्सव रथातून बँडवादनाच्या तालावर श्रींची मिरवणूक काढण्यात आली. नंतर ‘तुजविणे रिते जिणे’ या कोकणी नाटकाचा प्रयोग झाला.
रविवारी सकाळी अभिषेक, आरती, रात्री श्रींची विजयरथातून भव्य मिरवणूक, नंतर अंतर्नाद क्रिएशन निर्मित व यतीन तळावलीकर प्रस्तुत मराठी भक्तीगीतांचा व भावगीतांचा कार्यक्रम ‘शब्द सुराचे देणे’ झाला. आज सोमवार 13 रोजी सकाळी अभिषेक, आरती, रात्री 10 वा. देणगी कुपनांचा निकाल, नंतर 10.30 वा. ऑर्केस्ट्रा हंगामा म्युझिकल नाईट, तर पहाटे 1.30 वा. श्रींची ब्रह्मरथातून भव्य मिरवणूक होईल. त्यानंतर आरती व प्रसादाने उत्सवाची सांगता होईल.
वेरोडा येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थान हे पुरातन देवस्थानांपैकी एक असून नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पांझरखण येथून वा कुंकळळी बाजार येथून दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले असून पर्वत-पारोडा येथील सुप्रसिद्ध श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानच्या पश्चिम दिशेस पायथ्याशी अगदी जवळ आहे. संस्थानच्या समितीचे अध्यक्ष गौरीश फडते देसाई, सचिव महेश ए. देसाई, खजिनदार दामोदर स. देसाई, ऍटर्नी ताराचंद देसाई हे उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.