प्रतिनिधी /कुंकळ्ळी
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीण संस्थानात त्रैवार्षिक शतचंडी अनुष्ठानची रविवार 12 रोजी मंत्रघोषात समाप्ती झाली. वेदशास्त्रसंपन्न मुख्य आचार्य दीपक डेगवेकर, वेदमूर्ती गुरुदास शिवडेकर व अन्य 30 ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत या अनुष्ठानाला गुरुवार 9 रोजी सुरुवात झाली होती. या विधीत 12 गावकरांचा सहभाग राहिला. या तीन दिवसांत देवीला कुंकुमार्चन करण्यात अनेक महिलांनी भाग घेतला तसेच भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. रविवारी कापड, खण, नारळ एकत्रितरीत्या होमकुंडात मनोभावे वाहिले गेले.
कुंकळ्ळीचे आमदार तथा मुरगाव एसजीपीडीएचे चेअरमन क्लाफासियो डायस यांनी मंदिरात उपस्थित राहून श्रांचे दर्शन घेतले. त्यांनीही मनोभावे प्रार्थना करून कापड, खण, नारळ होमकुंडात वाहिले. त्यांच्यासमवेत अध्यक्ष नितीन नाईक देसाई, सचिव नीलेश नाईक देसाई, खजिनदार प्रशाला देसाई, ऍटर्नी रमेश देसाई उपस्थित होते. त्यांनीही होमकुंडात श्रीफळ वाहिले.
गुरुवारी शतचंडी शतकलशाभिषेक सेवा या धार्मिक विधीला प्रारंभ झाला. शुक्रवारी सकाळी स्थलप्राकारशुद्धी, देवतास्थापना, चंडीपाठ प्रारंभ, शांतिपाठ, शनिवारी सकाळी स्थलप्राकारशुद्धी, देवतापूजन, चंडीपाठ, नवग्रह हवन, वास्तू हवन, शतकलशाभिषेक, प्राकारबली, कुमारिका व सुहासिनीपूजन, तर रविवारी सकाळी स्थलप्राकारशुद्धी, चंडीहवन, महाबलिराम, कुष्मांडबळी, परिवार देवता हवन, क्षेत्रपाल हवन, भैरव हवन, पूर्णाहुती व सामुदायिक प्रार्थना झाली. भाविकांनी प्रत्येक दिवशी दुपारी महाप्रसादाचाही लाभ घेतला.