निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची माहिती
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी दोन सदस्याचे केंद्रीय पथक काल गुरुवारी सोलापुरात दाखल झाले होते. पाच दिवस ते मुक्कामी राहून अभ्यास करून प्रशासनाला योग्य त्या सूचना करणार होते. मात्र या पथकातील एक सदस्य डॉ. ए .जी अलोन कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.
सोलापूर शहर, जिल्ह्यात दररोज 500 हून अधिक कोरोना रुग्णांची भर पडत आहे. नेमक्या कोरोना वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय पथक पाच दिवसासाठी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. मात्र पुण्यावरून स्वतःच्या वाहनातून येणाऱ्या या पथकाचा वाहनचालक गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्या दोन सदस्यांची आज शुक्रवारी कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी एक सदस्य कोरोना बाधित झाले असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर दुसरे सदस्य डॉ. पियुष जैन हे होम क्वांरटाईन आहेत.