वृत्तसंस्था/ मुंबई
सईद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत हरियाणा संघाने साखळी फेरीतील आपले सर्व म्हणजे पाचही सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश मिळविला. मंगळवारी इ गटातील झालेल्या सामन्यात हरियाणाने केरळचा 4 धावांनी पराभव केला. दुसऱया एका सामन्यात दिल्लीने पाँडिचेरीचा 110 धावांनी दणदणीत पराभव केला.
या स्पर्धेच्या इ गटात हरियाणाने गुणतक्त्यात आपले पाचही सामने जिंकून 20 गुणांसह पहिले स्थान पटकाविले. या कामगिरीमुळे हरियाणाने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी (बाद फेरी) गाठली. मंगळवारी झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात हरियाणा संघाने 20 षटकांत 6 बाद 198 धावा जमविल्या. त्यानंतर केरळने 20 षटकांत 6 बाद 194 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 4 धावांनी गमवावा लागला. हरियाणा संघातील शिवम चौहानने 34 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 59, बिश्नोईने 29 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 45, अरूण चापराणाने 10 धावा केल्या. सुमीतकुमारने 10 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 21 धावा जमविताना तेवातिया समवेत सातव्या गडय़ासाठी अभेद्य 52 धावांची भागिदारी केली. केरळतर्फे सक्सेना आणि सचिन बेबी यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. त्यानंतर केरळच्या डावात सचिन बेबीने 68, संजु सॅमसनने 51, मोहम्मद अझरूद्दीनने 35 धावा केल्या. सचिन बेबीने 36 चेंडूमध्ये 6 षटकार आणि 3 चौकार ठोकले. सॅमसन आणि अझरूद्दीन यांनी दुसऱया गडय़ासाठी 81 धावांची भागिदारी केली. हरियाणातर्फे सुमीतकुमार आणि अरूण चापराणा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या गटात मुंबई आणि आंध्रप्रदेश या दोन्ही संघाचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे.
इ गटातील दुसऱया एका सामन्यात दिल्लीने पाँडिचेरीचा 110 धावांनी पराभव केला. दिल्लीने 20 षटकांत 5 बाद 192 धावा जमविल्या. दिल्ली संघातील के.शर्माने नाबाद 65 तर हिंमत सिंगने 53 झळकविल्या. पाँडिचेरीतर्फे ए राजीव आणि रोहित दामोदरन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर पाँडिचेरीचा डाव 82 धावांत आटोपला. डी रोहितने 14 तर जॅक्सनने 13 धावा जमविल्या. दिल्लीच्या वशिष्टने 9 धावांत 4 तर सिद्धूने 7 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
हरियाणा 20 षटकांत 6 बाद 198, केरळ 20 षटकांत 6 बाद 194
दिल्ली 20 षटकांत 5 बाद 192, पाँडेचेरी सर्वबाद 82.