प्रतिनिधी/ चिपळूण
सर्वत्र मंगळवारी कोविड लसीकरण हे शासनाचे संकेतस्थळ बंद राहिल्याने लसीकरण थांबले. यामुळे सरकारी कर्मचारी, खासगी डॉक्टरांवर अनेक तास ‘वेटींग’ राहण्याची वेळ आली. त्यातच ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱया लसीबाबतही स्पष्ट आदेश आले नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. एकंदरीत या लसीकरणाबाबत खेळखंडोबा सुरू असल्याचे दिसत आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून आलेले कोरोनाचे संकट आजही कायम आहे. मध्यंतरी त्याचा संसर्ग कमी झाला होता. मात्र आता तो पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासन संतर्क झाले असून तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातच काही महिन्यांपासून शासनाने लस देण्यासही सुरूवात केली आहे. तालुक्याचा विचार करता येथील शासकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, खासगी डॉक्टर, त्यांचे कर्मचारी असा हजारोजणांना लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला, तर पहिल्या टप्प्यातील हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. मात्र हे लसीकरण योग्य पध्दतीने व्हावे, त्यात काळाबाजार होऊ नये, यासाठी शासनाने कोविड लसीकरण हे खास संकेतस्थळ तयार केले आहे. येथून लाभार्थ्यांची यादी येत असून त्यानुसार त्याला लस देताच या संकेतस्थळावर नोंद करण्याची अट शासनाने घातली आहे. मात्र हे संकेतस्थळ अनेकदा बंद रहात असल्याने लसीकरण करण्यात अडचणी येत आहेत. मंगळवारी तर ते पूर्णपणे बंद होते. त्यामुळे लसीकरण पूर्ण सोडाच ते करणेही कठीण बनले. यामुळे अनेक कर्मचारी, खासगी डॉक्टर यांना अनेक तास ताटकळत रहावे लागले. सध्या कामथे उपजिल्हा रूग्णालय, पवनतलाव मैदान कक्ष व डेरवण रूग्णालय येथे लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच एसएमएस व लाईफकेअर रूग्णालयातही लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र येथे अद्याप लसीकरण सुरू करण्यात आले नसल्याचे वृत्त आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबत संभ्रमावस्था
काही दिवसांपूर्वी शासनाने दुसऱया टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र त्या बाबत तितक्याशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना मोफत की विकत लस द्यायची, इथपासून त्यांची संबंधित संकेतस्थळावर नोंदणी कशी व कोणी करायची, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
41 रूग्णांवर उपचार सुरू
सध्या लसीकरण सुरू असले तरी दुसरीकडे दिवसाला काही कोरोना रूग्णही सापडत आहेत. येथील कामथे कोविड सेंटरसह खासगी कोविड सेंटरमध्ये 41 रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या पवनतलाव मैदान परिसरातील कक्षासह प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये कोरोना तपासणी सुरू आहे.
पध्दत सोपी असावीः बांगी
ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबत बोलताना चिपळूण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उस्मान बांगी म्हणाले की, आम्हांला लस देणार, ही गोष्ट चांगलीच आहे. ही लस घेण्यास सर्व ज्येष्ठ नागरिक तयार आहेत. मात्र त्यासाठी नोंदणी व अन्य बाबी जरा किचकट वाटत असून लसीकरण योग्य पध्दतीने करण्यासाठी लसीकरणाची सोपी पध्दत आणावी, अशी आमची मागणी आहे.