आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
विमान मार्गातून गोव्यात येणाऱया प्रवाशांची कोरोना व्हायरस प्रतिपिंड चाचणी करण्याची मान्यता द्यावी, अशी मागणी नागरी विमानोड्डान मंत्रालयाकडे केली आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. राज्यात सोमवारपासून देशपातळीवर (डोमेस्टीक) विमानसेवा पुन्हा सुरु होणार असून त्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली आहे.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, सोमवारी किमान 15 विमाने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ दाबोळी येथे उतरणार असून त्यांचे वेळापत्रक तयार आहे. विमानातून येणाऱया प्रवाशांना राज्यात प्रवेश करण्यापूर्वीच कोरोना व्हायरस प्रतिपिंड चाचणी केल्यानंतर जे प्रवासी कोरोनाबाधित नसतील त्या प्रवाशांना कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल त्यासाठी विमानातून येणाऱया प्रत्येक प्रवाशाची कोरोना व्हायरच प्रतिपिंड चाचणी करण्यासाठी मान्यता द्यावी म्हणून आयसीएमआर व नागरी विमानोड्डान मंत्रालयाकडे विनंती केली असल्याचेही राणे यांनी सांगितले.
विमानातून येणाऱया प्रवाशांची कोरोना व्हायरस प्रतिपिंड चाचणी करणे राज्याच्या दृष्टिकोनातून हितकारक ठरणार आहे. एखादा प्रवासी कोरोनाबाधित आहे की नाही त्याची पडताळणी विमानतळावरच होणार आहे. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांची ओळख अधिकाऱयांना विमानतळावरच मिळणार असून त्यांच्यावर पुढील उपचार करणे सोपे जाईल तसेच कोरोनाबाधित रुग्णाला समुदायापासून दूर ठेवणे सोपे जाईल व त्यामुळे समुदायाला संसर्ग होणार नाही.राज्यात येणाऱया प्रवाशांना सुधारित एसओपी देण्याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करणार असल्याचेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले. दरम्यान गोवा विमानतळ संचालक गगन मलीक यांनी सांगितले की, विमानतळावर येणारी विमाने कुठे व कशी लागणार ती बोर्डींग कुठे होणार याबाबत नागरिक विमानोड्डान मंत्रालयाने सर्व मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत.