प्रतिनिधी / पणजी
कोरोना महामारीचा मोठा फटका पणजी महापालिकेला बसला असून मनपाचे महसुली उत्पन्न मोठय़ा प्रमाणात बुडाले आहे. किमान 80 ते 90 टक्के महसुलाला मनपाला मुकावे लागले आहे. आर्थिक उत्पन्न बुडाल्याने येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमधील कर्मचाऱयांचे वेतन देणेही मनपाला शक्य होणार नाही. उत्पन्न बुडाल्याने मनपाने नवीन विकास प्रकल्प हाती घेण्याचे बंद केले आहे. घरपट्टी आणि व्यापार परवाना फी अडकल्याने मनपाला सुमारे 10 ते 20 कोटींना मुकावे लागले आहे.
कोरोना महामारीचा मोठा फटका व्यवसायाला बसला आहे. राज्यातील बरेच व्यावसाय ठप्प आहेत. सरकारला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पणजी महापालिकेलाही प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे. महसुली उत्पन्न साधारणपणे वीस टक्यांवर आले आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात मनपाला घरपट्टीच्या रुपात प्रतिदिन 60 ते 70 लाख रुपयांचा महसूल मिळत होता. एका एप्रिल महिन्यातच 10 ते 12 कोटींची रुक्कम घरपट्टीच्या रुपात मिळत होती. मात्र यंदा हा महसूल दहा टक्क्यांवर आला आहे. पणजीतील प्रदर्शने, फेरी बंद झाल्याने त्याचाही फटका बसला आहे.
व्यापार परवान्यांचाही महसूल बुडाला
व्यापार परवान्यांचे नूतनीकरण, नवीन परवाने, तसेच बांधकाम परवाने याच्या रुपात पणजी मनपाला मोठय़ा प्रमाणात महसूल मिळत होता. हॉटेल व्यावसायातूनही महसूल प्राप्त होत होता. मात्र यंदा मार्चमध्ये राज्यात हॉटेल व्यवसाय बंद झाला. त्यामुळे मनपाला फटका बसला. पणजी मनपा कार्यकक्षेतील व्यवसाय बंद झाल्याने मनपाला आर्थिक दृष्टय़ा मोठा फटका बसला आहे.
व्यवसाय परवाने रद्द करण्यासाठी 40 अर्ज
मनपाच्या महसुली उत्पन्नात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कर्मचाऱयांना पगार कसा द्यायचा याची चिंता मनपाला आहे. कर्मचाऱयांच्या पगाराची रक्कम महिना अडीच कोटीच्या घरात जाते. उत्पन्नातील 70 ते 80 टक्के रक्कम पगारावरच खर्च होते. जीएसटी लागू झाल्यानंतर ऑक्ट्रॉयच्या स्वरुपात मिळणारा महसुलही बंद झाला आहे. सरकारकडून मनपाला बराच निधी येणे आहे.