संशोधकांसाठी प्रत्येक संकट ही जणू नवी संधी असते, हे अक्षरशः खरं आहे. सध्या जगाला कोरोनानं पिडलं आहे. राष्ट्र गरीब असो किंवा श्रीमंत, कोरोना काही कुठला भेदाभेद करीत नाही. शिवाय आजवर या रोगावर खात्रीचा तोगडाही सापडलेला नाही. लसी वगैरे आहेत, पण खात्रीचं औषध सापडल्याखेरीज काही खरं नाही. अशा स्थितीत अनेक माणसं नवनव्या कल्पना आणि संकल्पना साकारून कोरोनाला वेसण घालण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा प्रयत्नाची फलश्रुती आहे एक असं घडय़ाळ, की जे आपल्याला कोरोनासंबंधी सावध करू शकतं.
मुख्य म्हणजे, हे तंत्रज्ञान पूर्णतः भारतीय आहे. लक्ष्मीश्री सूर्या सॉफ्टवेअरतज्ञानं ते शोधलं आहे. वास्तविक हे मुख्यतः वेळ दाखविणारं घडय़ाळ नाही. पण ते मनगटावर घडय़ाळासारखं बांधलं जाऊ शकतं. त्यामुळं त्याला घडय़ाळ म्हणायचं. तर याचा उपयोग असा आहे की. त्यामुळं आपण कोणत्याही कोरोना रूग्णापासून 6 फूट अंतरावर पोहचलो की ते आपल्याला सावध करतं. तुमच्या सान्निध्यात कोरोनाचा सक्रीय रूग्ण आला आहे, असा इशाराच आपल्याला या साधनाद्वारे मिळतो. त्यामुळं त्वरित तुम्ही त्या जागेपासून सुरक्षित दूर जाऊ शकता.
यात आयआर डिटेक्टर बसविण्यात आला आहे. सूर्या यांनी एक सूत्रसंच (अलगोरिदम) विकसीत केला आहे जेणेकरून कोणताही कोरोनाबाधित रूग्ण आपल्यापासून सहा फूट अंतरावर आला की आपल्याला सावधानतेचा इशारा या साधनाद्वारे दिला जातो. याचं मोठय़ा प्रमाणावर उत्पादन केलं जाणार आहे.