म्युकर मायकोसिससंदर्भात कान, नाक, घसा तज्ञ व रुग्णालयांची बैठक घ्या
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी शासनाच्या योजनांचा लाभ घेणारी रुग्णालये हात वर करत आहेत. यामुळे एखादा रुग्ण जर दगावला तर त्याचे अंत्यसंस्कार हे त्या रुग्णालयाच्या दारातच करु, असा इशारा शिवसेनेने सोमवारी दिला. तसेच संबंधित रुग्णालये व कान, नाक, घसा तज्ञ यांची बैठक घ्यावी, अशी मागणीही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर म्युकर मायकोसिसचे उपचार आणखी पाच रुग्णालयांमध्ये करावे, याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाईल, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर करुन चर्चा केली. यावेळी आरोग्य विभागाच्या बाह्यसंपर्क अधिकारी डॉ. हर्षला वेदक, महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेचे समन्वयक डॉ. सुभाष नांगरे, माजी आमदार सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.
संजय पवार म्हणाले, म्युकर मायकोसिसचे उपचार करण्यासाठी शासनाकडून लाभ घेणारी रुग्णालये चालढकल करत आहेत. हे त्यांच्या व्यवसायाला व मानवतेला अशोभनीय आहे. पैशापेक्षा रुग्णांचा जीव वाचणे हे महत्वाचे असते. परंतु कोल्हापूरात दुर्देवाने अनेक ठिकाणी घडत नाही. याचा सर्व भार ‘सीपीआर’ वर पडत आहे. म्युकर मायकोसिस उपचारासाठी पाच रुग्णालये शासनाने जाहीर केली आहेत. परंतु आतापर्यंत 25 शस्त्रक्रिया या सीपीआर मध्ये व तीन खासगी रुग्णालयात झाल्या आहेत. या आजाराच्या रुग्णांची औषधाविना व पैशाअभावी हाल होत आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णालये व डॉक्टरांवर जिल्हाधिकार्यांनी कायदेशीर कारवाई करावी.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, म्युकर मायकोसिसवरील उपचाराचा भार सीपीआरवर पडणार नाही हे पाहीले जाईल. यासाठी आणखी पाच रुग्णालयांमध्ये उपचार व्हावेत, यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवू. तसेच लवकरच कान, नाक, घसा तज्ज्ञांची बैठक घेतली जाईल.
यावेळी शहरप्रमुख शिवाजी जाधव, हर्षल सुर्वे, पफ्पू नाईक, मंजित माने, प्रवीर पालव, चेतन अष्टेकर, अभिजीत बुकशेट, निलेश जाधव आदी उपस्थित होते.