सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उदघाटन
वार्ताहर/पाचगाव
पाचगाव, कळंबा, मोरेवाडी परिसरात कार्यान्वित करण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारी कारवायांना आळा बसेल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला . आज, रविवारी (दि.2) सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाचगाव येथील सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाचे उदघाटन केले .
या उद्घाटन सोहळ्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके ,आमदार ऋतुराज पाटील ,जिल्हाधिकारी दौलत देसाई ,पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल ,अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत अमृतकर ,पाचगावचे सरपंच संग्राम पाटील ,करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पाचगाव ,मोरेवाडी, कळंबा परिसरात गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी या तिन्ही गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता . पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून व जिल्हा वार्षिक नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजना 2019 -20 सालच्या मंजूर केलेल्या निधीमधून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पाचगाव कळंबा व मोरेवाडी परिसरातील प्रमुख चौकांमध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत . या कॅमेर्यांचा नियंत्रण कक्ष पाचगाव मधील षटकोणी शाळेमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे .
पाचगाव मधील महत्त्वाच्या चौकांमध्ये एकूण 56 कॅमेरे ,कळंबा येथे 28 , तर मोरेवाडी मध्ये 63 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत . या तीनही गावात मिळून एकूण 147 सीसीटीव्ही कॅमेरे प्रमुख चौकांमध्ये बसवण्यात आले आहेत .या कॅमेऱ्यांमुळे या तिन्ही गावांमधील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे.