मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाचे चौकार षट्कार ठोकत प्रेक्षकांकडून प्रेमाच्या टाळय़ा घेणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव क्रिकेटच्या मैदानावरही फटके लगावत असतो. मुंबईच्या चाळीत राहत असताना लागलेलं क्रिकेटचे हे वेड सिद्धार्थने आजही जपले आहे. महाराष्ट्राचा मोस्ट एनर्जेटिक अभिनेता म्हणजेच आपल्या सिद्धार्थच्या डाव्या हाताच्या अंगठय़ाला सध्या दुखापत झाली असून त्याला चार टाके पडले आहेत. आता सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल, की सिद्धार्थला ही दुखापत झाली कशी ? याबाबत अनेक तर्कवितर्क तुम्ही लावले असतील. परंतु त्याला ही दुखापत क्रिकेटच्या सरावादरम्यान झाली आहे. सध्या सर्वत्र आयपीएलचे वारे वाहत आहे. त्यातच मराठी इंडस्ट्रीची क्रिकेट टूर्नामेंटही लवकरच सुरु होणार असून एका संघाचा सिद्धार्थ कर्णधार आहे. सराव सामना खेळताना त्याला ही दुखापत झाली आहे. त्याच्यावर त्वरित उपचारही करण्यात आले. मात्र उपचार करून शांत बसेल तर तो सिद्धार्थ कसला? उपचार झाल्यावर आराम न करता सरळ हातात बॅट पकडून पूर्वीच्याच एनर्जीने त्यानं सरावाला सुरुवातही केली. यातूनच तो अभिनयासोबतच क्रिकेटच्या बाबतीतही किती पॅशनेट आहे, हे कळतंय. मुळात सिद्धार्थ हा क्रिकेटप्रेमी आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्याने वेळोवेळी आपले हे क्रिकेटप्रेम सोशल मीडियावरून व्यक्तही केले आहे. त्याने पहिल्यांदा स्टेडियममध्ये पाहिलेल्या सचिनच्या मॅचचा अनुभवही चाहत्यांसोबत शेअर केला होता. क्रिकेट की आराम असा पर्याय दिल्यावर क्रिकेटला प्राधान्य देणाऱया सिद्धार्थचा हात या टूर्नामेंटमध्येही जबरदस्त चौकार आणि षट्कार मारण्यासाठी लवकर बरा होऊ दे अशा कमेंट त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शेअर होत आहेत.
Previous Articleकोरोना कहर : महाराष्ट्रात 61,695 नवे बाधित; 349 मृत्यू
Next Article कोरोनाचा कहर : आता ‘या’ राज्यातही विकेंड कर्फ्यू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.