अट्टल चोरटय़ाच्या पणजी पोलिसांनी आवळल्या मुसक्या : संशयित मागील दहा वर्षापासून गोवा पोलिसांना देत होता गुंगारा
वार्ताहर /माशेल
खांडोळा-माशेल येथील महागणपती देवस्थानात झालेल्या दहा लाख रूपयांचा धाडसी चोरीप्रकरणी अट्टल चोरटय़ाचा मुसक्या आवळण्यात पणजी पोलिसांनी चोख कामगिरी बजावली. संतोष कुमार दास (42, मूळ ओरीसा) असे संशयिताचे नाव आहे. चोरीची घटना 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वा. सुमारास उघडकीस आली होती. चोराच्या मुसक्या आावळण्यात उपअधिक्षक सी एल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी पोलिस निरीक्षक निखील मांदेकर यांनी उत्तम कामगिरी केली. त्यानंतर संशयिताला फोंडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरात चोरीप्रकरणी पणजी व पर्वरी पोलिसही त्याच्या मागावर होते. खांडोळा माशेल येथील मंदिरात चोरी करताना दास यांने पाठीमागील दरवाजातून आतमध्ये प्रवेश घेत मुर्तीच्या मस्तकावर धारण करण्यात येणारा सोन्याचा लेप असलेला चांदीचा मुकुट, गणपतीची कित्येक वर्षाची चांदीची प्रभावळ, श्रीला साजविण्यासाठी असलेल्या चांदीच्या वस्तू चोरटय़ानी लंपास केल्या होत्या तसेच फंडपेटीतून सुमारे 10 हजार रूपयाची रोख रक्कमेसह त्याने पलायन केले होते. संशयिताने चोरीप्रकरणी वापरलेले लोखंडी सळी व स्क्रू ड्रायव्हर मंदिराच्या काही अंतरावर झुडूपातून फेंडा पोलिसानी जप्त करण्यात आले आहे.
पर्यटक म्हणून रूबाबात येऊन चोरी करून फरार व्हायचा…
फोंडय़ाचे पोलीस उपअधिक्षक सी एल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित संतोष दास हा अट्टल चोरटा असून मागील दहा वर्षापासून गोव्यात झालेल्या अनेक मंदिरात चोरीप्रकरणी त्याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्याची जमेची बाजू अशी की तो एकटाच चोरी करतो. टापटीप वेशात मंदिराची रेकी केल्यानंतर वास्तव्यास असलेल्या हॉटेलमधून रूम सोडतो. यावेळी त्याच्यासाठी भाडय़ाची कारगाडी तयार असते. सुटकेस घेऊन तो पहाटे चोरीच्या ठिकाणी मंदिरात पोचत असे. मंदिरात चोरीचे काम बजावल्यानंतर राज्याबाहेर जात असे. खांडोळा येथील चोरीच्या घटनेतही त्याने पणजी येथून टुरिस्टसारखा टॅक्सीतून येत रात्री खांडोळा येथील मंदिर गाठले होते. चोरी करून पहाटे तो फरार झाल्यानंतर कोल्हापूर येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मूळ ओरीस येथील असला तरी त्याचा थांगपत्ता कुणालाच नसतो.ओरीसा येथेही घरी शोधायला गेल्यावरही तो कधी सापडत नसून चोरीनंतर कायम भ्रमंतीवर असतो. प्रत्येकवेळी मोबाईल बदलणे हाही त्याच्या प्लॉनमधलाच भाग असतो. सी एल पाटील निरीक्षक म्हणून कार्यरत होते त्यावेळी याच संशयिताने त्याला गुंगारा दिला होता. पोलीस सेवेच्या आपल्या अखेरच्या टप्प्यात चोराच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. संशयिताची सद्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहे.