कारागृहातील कर्मचाऱयांना मारहाण
प्रतिनिधी/ सातारा
वाई येथे हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून कुंडय़ामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्गीस व्हिक्टर मानका (वय 31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 दोन्ही रा. जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांनी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सातारा जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊन धिंगाणा घातला तर कारागृहातील दोन कर्मचाऱयांना मारहाण करत सीसीटीव्ही व टॉयलेटचा दरवाजाही तोडून टाकल्याची घटना घडली.
दि. 22 रोजी सायंकाळी 5 वाजता संशयितांनी कारागृहातील पंधरा खोली विभागातील खोली क्रं 5 मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयाची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड केली. त्यापुढे जात या दोघांनी कारागृह कर्मचारी संदीप फाळके व रमेश ओव्हाळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद कारागृहातील हवालदार सुरेश पाटील यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वाई शहरातील नंदनवन कॉलनीतील “विष्णू श्री स्मृती’ या बंगल्यात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून बंगल्याच्या तीन बेडरूममध्ये, गॅलरीत, टेरेसवर कुंडय़ामध्ये गांजाची लागवड केल्याने पोलिसांनी 29 किलो गांजा इतर साहित्य असा आठ लाख 21 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून सर्गीस मानका, सेबेस्टीन मुलर या दोन जर्मन नागरिकांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.
संशयितांनी कारागृह कर्मचारी फाळके व ओव्हाळ या दोघांशी उद्धट वर्तन करण्यास सुरूवात केली. संशयितांनी या दोन्ही कर्मचाऱयांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कारागृहातच विवस्त्र होऊन धिंगाणा घातला. हा प्रकार शांत झाल्यानंतर फाळके व ओव्हाळ हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंधरा खोली विभागात गस्त घालत असताना त्यांना पाहून संशयितांनी चिडून जावून पंधरा खोली विभागातील ते बंदिस्त असलेल्या खोली क्रं 5 मधील सीसीटीव्ही कॅमेयाची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर करत आहेत.