ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गुगल आणि फेसबुक या डिजिटल माध्यमातील आघाडीच्या कंपन्यांनी आपले उत्पन्न जाहीर करावे, असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने कंपन्यांना दिले आहेत.
ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांना उत्पन्नाचा मार्ग खुला करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन कोषाध्यक्ष जोश फ्रायडेनबर्ग यांनी सांगितले की, दोन्ही कंपन्यांना पारंपरिक प्रसारमाध्यमांशी आत्मविश्वासाने वाटाघाटी कराव्या लागतील. या नियमावलीचे पालन झाले नाही तर त्यांना 7 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्याची बंधनकारक मध्यस्थीची प्रक्रिया सरकारला करावी लागेल.
यासंदर्भातील नियमावली ऑगस्टपर्यंत तयार करण्यात येणार आहे. उत्पन्न जाहीर करण्याची नियमावली सध्या फक्त फेसबुक आणि गुगलपुरतीच मर्यादित आहे. भविष्यात इतर डिजिटल माध्यमांनाही ही नियमावली लागू केली जाऊ शकते. डिजिटल माध्यमातून पारंपारिक माध्यमांचे शोषण होत असल्याच्या आरोप या कंपन्यांवर होत आहे. गुगल आणि फेसबुक या डिजिटल कंपन्यांविरुद्ध नियामक आणि राजकीय आघाडी सुरू करणारे हे जगातील पहिले पाऊल आहे, असे या आदेशात म्हटले आहे.