लॉस एंजिल्स / वृत्तसंस्था
अमेरिकेचा अव्वल गोल्फपटू टायगर वूडस बुधवारी एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाला. वूडसची एसयूव्ही भरधाव वेगाने रस्त्याच्या शेजारील लेन्सला आदळली आणि त्यानंतर काही अंतर फरफटत गेली. 45 वर्षीय वूडस मात्र सावध होता आणि त्याने तात्काळ सेवेला पाचारण केले. प्रंट विंडशिल्ड उघडत टायगर वूडसला कारमधून बाहेर काढले गेले.
वूडसला पायाची शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली असल्याचे त्याच्या प्रवक्त्याने उशिराने जाहीर केले. वूडसने मद्यसेवन केल्याचे निदर्शनास आले नाही. पण, त्याची कार किती वेगात होती, याची माहिती उपलब्ध झालेली नाही.
टायगर वूडस जेनेसिस निमंत्रितांच्या गोल्फ स्पर्धेतील मुख्य निमंत्रित या नात्याने हजर राहण्यासाठी लॉस एंजिल्समध्ये होता. रविवारी त्याने या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला हजेरी लावली व त्याच्या हस्ते चषकही प्रदान केला गेला. या जेनेसिस कंपनीचीच ही कार होती. एरवी, सेलेब्रिटींना कार्यक्रमात भाग घेण्यासाठी त्यांना कारची सुविधा प्रदान केली जाते. पण, रविवारचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन दिवसांनंतरही कार त्याने आपल्याकडेच ठेवली असल्याचे यात स्पष्ट झाले.
रविवारी स्पर्धा संपन्न झाल्यानंतर सोमवार व मंगळवार या दोन दिवसात त्याने डिस्कव्हरी चॅनेलची मालकी असलेल्या गोल्फ टीव्ही वाहिनीसाठी एका कार्यक्रमात भाग घेतला. कॉमेडियन डेव्हिड स्पेडसमवेतचे त्या कार्यक्रमातील एक छायाचित्रही त्याने ट्वीट केले होते. वूडस 15 वेळचा मेजर चॅम्पियन असून कारकिर्दीत त्याने 82 अजिंक्यपदे संपादन केली आहेत.