विश्वचषक फुटबॉल ः रोमांचक लढतीत द.कोरिया 2-3 ने पराभूत
वृत्तसंस्था/ दोहा
येथील एज्युकेशन सिटी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील गट ह मधील रोमांचक सामन्यात घानाने दक्षिण कोरियाचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव करून पहिला विजय नोंदवला. 3 गुणांसह सध्या गटात ते दुसऱया स्थानावर आहेत.
द.कोरियाने उत्तरार्धात दोन मिनिटांच्या अंतराने दोन गोल नोंदवत घानाशी 2-2 अशी बरोबरी साधली होती. पूर्वार्धात कोरिया 0-2 असे पिछाडीवर पडले होते. पण सात मिनिटांनंतर मोहम्मद कुडुसने नोंदवलेला गोल घानासाठी निर्णायक गोल ठरला. या विजयाचे त्यांना 3 गुण मिळाले असून पोर्तुगालनंतर ते दुसऱया स्थानावर पोहोचले आहेत. पोर्तुगालचेही 3 गुण झाले आहेत. पण त्यांची गोलसरासरी घानाहून सरस आहे. त्यामुळे घानाला बाद फेरी गाठण्याची अजूनही संधी आहे.
24 व्या मिनिटाला मोहम्मद सालिसूने घानाला आघाडीवर नेले. ऑन टार्गेटवर केलेला त्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. 34 व्या मिनिटाला कुडुसने एका अप्रतिम हेडरवर ही आघाडी 2-0 अशी केली. उत्तरार्धात द.कोरियाने खेळ उंचावत आक्रमक प्रदर्शन केले आणि चो गुइ सुंगने हेडरवर दोन (58 व 61 वे मिनिट) शानदार गोल नोंदवून घानाशी बरोबरी केली. पण कुडुसने 68 व्या मिनिटाला कोरियाच्या बचावातील ढिलाईचा लाभ घेत निर्णायक गोल करून घानाचा विजय निश्चित केला.
स्टॉपेज टाईममध्ये घानावर कोरियाने अनेक आक्रमणे केली. यावेळी घानाच्याच क्षेत्रात खेळ सुरू होता. पण कोरियाला बरोबरीचा गोल नोंदवण्यात यश आले नाही. घाना या सामन्यात पराभूत झाले असते तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असते. पहिला सामना त्यांनी गमविला होता. घानाचा शेवटचा सामना 2 डिसेंबर रोजी उरुग्वेविरुद्ध तर कोरियाचा सामना पोर्तुगालविरुद्ध होणार आहे.