कर्मचाऱयांकडून तारेवरची कसरत : ग्राहकांची रीघ
प्रतिनिधी / बेळगाव
सलग चार दिवसांनंतर बुधवारी बँका पुन्हा सुरू झाल्या. आर्थिक वर्षअखेर असल्याने आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच बँकांमध्ये ग्राहकांची रीघ लागली होती. ग्राहकांची संख्या वाढल्याने बँक कर्मचाऱयांना दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. पैसे भरणाऱयांची व काढणाऱयांची संख्या सर्वाधिक दिसून आली.
खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱयांच्या संघटनांनी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला होता. शनिवार दि. 13 रोजी दुसरा शनिवार, रविवारी साप्ताहिक सुटी तर सोमवार-मंगळवार बँकांचा संप असल्याने सलग चार दिवस बँका बंद होत्या. आर्थिक व्यवहारांचा पाया असलेल्या बँका बंद असल्याने आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांना एटीएम तसेच डिजिटल माध्यमांवर अवलंबून राहावे लागले.
बुधवारी बँका सुरू झाल्यानंतर पैसे काढणे, पैसे भरणे, पेन्शनची रक्कम, बँक स्टेटमेंट काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. वर्षअखेर असल्याने कर्जासंबंधित ग्राहकांची धावपळ सुरू होती. बँकेत ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे कर्मचाऱयांच्या नाकीनऊ आले. त्यातच काही बँकांमध्ये सर्व्हर डाऊनचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत होता. यामुळे आपली कामे पूर्ण करून घेण्यासाठी ग्राहकांना हेलपाटे मारावे लागले.