ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनने मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या अवकाशयान उतरवले आहे. ‘ताईन्वेन-1’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते मानवविरहित आहे. चीनमधील वृत्तसंस्था शिनुआने याबाबत वृत्त दिले आहे.
‘ताईन्वेन-1’ हे अवकाशयान मंगळावर उतरलेल्या ठिकाणाला युटोपिया प्लॅन्शिया म्हटले जाते. या अवकाशयानातून सौर ऊर्जेवर चालणारा रोव्हर झुरोंग पाठवण्यात आला आहे. त्याला कॅमेरेही आहेत, तो मंगळावरील सर्वेक्षण करेल. रोव्हर मंगळावरील माती आणि वातावरणाचाही अभ्यास करेल आणि त्याची माहिती चीनच्या अवकाश संशोधन केंद्राकडे पाठवेल.
चीनचे हे अवकाशयान पाच टन वजनाचे आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात चिनी बेट हैनान येथून ते प्रक्षेपित करण्यात आले होते. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर फेब्रुवारीमध्ये अवकाशयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. झुरोग रोव्हर यशस्वीरित्या कार्यरत झाल्यास चीनची मंगळ मोहीम यशस्वी ठरणार आहे. मंगळावर अवकाशयान उतरवणारा चीन हा दुसरा देश आहे.