वृत्तसंस्था/ हैद्राबाद
पाचव्या प्रिमियर बॅडमिंटन लीग सांघिक स्पर्धेत चेन्नाई सुपरस्टार संघाने अवाधे वॉरियर्सचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
चेन्नाई सुपरस्टार संघाने अवाधे वॉरियर्सचा शनिवारच्या लढतीत 4-3 अशा फरकाने पराभव करत शेवटच्या चार संघात स्थान मिळविले. या लढतीतील मिश्र दुहेरीचा पाचवा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरला. तत्पूर्वी झालेल्या पुरूष एकेरीच्या सामन्यात चेन्नाई सुपरस्टारच्या लक्षसेनने अवाधे वॉरियर्सच्या शुभंकर डे चा 15-7, 15-8 अशा गेमस्मध्ये पराभव केला. त्यानंतर दुसऱया सामन्यात चेन्नाई सुपरस्टारच्या इडोनेशियन बॅडमिंटनपटू सुगीयार्तोने अवाधे वॉरियर्सच्या व्हिन्सेंटचा 15-10, 15-8 असा पराभव केला. चेन्नाई सुपरस्टारने पुरूष एकेरीचे दोन्ही सामने जिंकले तर त्यानंतर अवाधे वॉरियर्सने महिला एकेरीचे आणि पुरूष दुहेरीचा सामना जिंकून रंगत आणली. अवाधे वॉरियर्सच्या झेंगने महिला एकेरीच्या सामन्यात चेन्नाईच्या गायत्री गोपीचंदचा 15-10, 15-5 असा पराभव केला. तर पुरूष दुहेरीच्या सामन्यात अवाधे वॉरियर्सच्या हेयून आणि सोझोनोव्ह यांनी चेन्नाई सुपरस्टारच्या धृव कपिला आणि आर. सात्विक साईराज यांचा 12-15, 15-11, 15-10 असा पराभव केला. शेवटच्या मिश्र दुहेरीच्या सामन्यात आर सात्विक साईराज आणि जेसीका यांनी अवाधे वॉरियर्सच्या ख्रिस्टीना पेडरसन आणि हेयून यांचा 15-11, 13-15, 15-14 असा पराभव करत अवाधे वॉरियर्सचे आव्हान संपुष्टात आणले.