वृत्तसंस्था /कौलालंपूर :
जपानचा जागतिक अग्रमानांकित बॅडमिंटनपटू केन्टो मोमोटा कार अपघातात जखमी झाला असून कारच्या ड्रायव्हरचे या अपघातात निधन झाले आहे. मोमोटाने येथे झालेल्या मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद मिळविल्यानंतर काही तासानंतर सोमवारी हा अपघात झाला.
25 वर्षीय मोमोटाच्या नाकाच्या हाडाला प्रॅक्चर झाले असून खरचटल्याच्या जखमाही झाल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले. स्पर्धा संपल्यानंतर विमानतळाकडे त्याला घेऊन जाणाऱया कारने पहाटे पावणेपाचच्या सुमारास हायवेवरून सावकाश जाणाऱया लॉरीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. मोमोटासह साहाय्यक प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट व बॅडमिंटन पंच यांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. मोमोटाने रविवारी मलेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकून या मोसमाची शानदार सुरुवात केली होती. मलेशियाचे क्रीडामंत्री सईद सादिक यांनी हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला. सर्व जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही ते म्हणाले. इतर जखमीमध्ये चेहऱयावर, हाताला व डोक्याला दुखापती झाल्या आहेत. अपघातानंतर जखमी व्यक्ती स्वतःहून गाडीबाहेर चालत आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोमोटा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून गेल्या वर्षी त्याने विक्रमी 11 अजिंक्यपदे पटकावली. त्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप, ऑल इंग्लंड ओपन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 2016 मध्ये त्याला जुगार खेळल्याबद्दल त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. एका मोसमात सर्वाधिक अजिंक्यपदे मिळविणारा तो एकमेव खेळाडू आहे. मलेशियाचा ली चाँग वेई, चीनचा लिन डॅन यांनाही असा पराक्रम करता आला नव्हता. आता ऑलिम्पिक सुवर्ण हे एकमेव लक्ष्य मोमोटासमोर आहे.