सर्वसाधारण सभेत अध्यक्ष राजीव परीट यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. संचालक मंडळांने घेतलेल्या अनेक निर्णयाचे कौतूक करताना सभेच्या अहवाल प्रतींवर केलेल्या खर्चावरही सभासदांनी बोट ठेवले. ऑनलाईन सभेमुळे मात्र सत्ताधाऱयांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना मर्यादा आल्या. सोसायटीस नुकत्याच संपलेल्या अर्थिक वर्षात 3 कोटी 18 लाख रूपयांचा विक्रमी नफा झाल्याची माहिती अध्यक्ष राजीव परीट यांनी दिली.
सभेमध्ये संस्थेच्या अर्थिक परिस्थितीबद्दल माहिती देताना अध्यक्ष परिट म्हणाले, 3 हजार 332 सभासद असलेल्या या संस्थेकडे मार्च अखेर 11 कोटी 33 लाख रूपयांचे भागभांडवल आहे. 103 कोटी 46 लाख रुपयांच्या ठेवी असून 106 कोटी 4 लाखांचे कर्ज वितरीत केले आहे. 142 कोटी 53 लाख रूपयांचे खेळते भांडवल असून संस्थेने 25 कोटी 89 लाखांची गुंतवणूक केली आहे. तर 16 कोटी 77 लाख रूपयांचा निधी असल्याचेही त्यांनी सांगितले. सन 2019-20 सालासाठी सभासदांना 12.50 टक्के डिव्हीडंड दिला जाणार असून कायम ठेवीवर 11 टक्के व्याज दिले जाणार आहे. 1 एप्रिल 2020 पासून कर्जावरील व्याज 1 टक्का कमी करून तो 10 टक्के केला आहे. भविष्यात कर्जावरील व्याज दर आणखी कमी करण्याचा मानस आहे. चार व कमी हप्ते थकबाकी असणाऱया सभासदांच्या नियमीत कर्जावर सन 2019-20 सालासाठी 1 टक्का व्याज रिबेट देणार असल्याचे परीट यांनी सांगितले.
रविंद्र घस्ते यांनी स्वागत केले. सचिन मगर यांनी श्रद्धांजलीचे ठराव मांडले. अध्यक्ष राजीव परीट यांनी प्रास्ताविक केले. व्ही.एन.बोरगे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. अध्यक्ष परिट यांनी सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. उपाध्यक्ष दिनकर तराळ यांनी आभार मानले. यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.