प्रतिनिधी / सातारा :
गेल्या तीन दशकांहून अधिक वर्षे प्रलंबित असणारी निवड वेतन श्रेणी जिल्ह्यातील 2089 सेवानिवृत्त शिक्षकांना मंजूर झाली आहे. अखिल सातारा जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव भुजबळ यांनी वयाच्या 82 व्या वर्षीही याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 747 शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त झाल्याने प्राथमिक शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया शंकरराव भुजबळ यांनी दिली आहे.
प्राथमिक शिक्षकांना निवड वेतनश्रेणी मंजूर झाल्याबद्दल अखिल सातारा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांची भेट घेवून आभार व्यक्त केले. याप्रसंगी भुजबळ बोलत होते. यावेळी शिक्षक संघाचे नेते दीपक भुजबळ, जिल्हाध्यक्ष संजीवन जगदाळे, कार्याध्यक्ष गणेश जाधव, सरचिटणीस अजित राक्षे, प्रसिध्दीप्रमुख उध्दव पवार, उपसरचिटणीस बसवराज दोडमणी, खजिनदार शहनाज तडसरकर, कोरेगाव तालुकाध्यक्ष विजय भुजबळ आदी उपस्थित होते.