सीपीआरचा आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा
कोल्हापूर प्रतिनिधी
शास्त्रीनगर परिसरातील एका रुग्णलयात शस्त्रक्रिया झालेल्या भाऊसो धोंडीराम कांबळे (वय 72 रा. घोटवडे पन्हाळा) यांना सीपीआरच्या आरोग्य विभाग आणि राजारामपुरीतील सहायक पोलीस निरीक्षकांनी कोणतीही खात्री न करता मृत दाखवले.यामुळे कांबळे कुटुंबियांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. यानिमित्ताने सीपीआर व पोलीस प्रशासनातील हलगर्जीपणा समोर आला असून संबंधित दोषीवर कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी संदीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
संदीप शिंदे यांनी सांगितले, भाऊसो कांबळे यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी 11 नोव्हेंबर 2020 रोजी शास्त्रीनगरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. लॅप्रोस्कोपी करण्याऐवजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी ओपन सर्जरी करुन तिसऱ्या दिवशीच घरी सोडले. यामुळे रुग्णाला त्रास झाल्याने दोन वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार करण्यात आले असताना त्यांच्या कुटुंबियांकडून पैसे घेण्याबरोबर उपचारात हलगर्जीपणा केल्याची तक्रार त्यांचा मुलगा विजय यांनी प्रशासनाकडे केली. पण प्रशासनाने उपचारात हलगर्जीपणा झाला नसल्याचे सांगत कांबळे यांच्यावर अन्याय केला. एवढेच नाही तर सीपीआरच्या वैद्यकीय अधिकारी व राजारामपुरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकांनी कांबळे यांना कागदोपत्री मृत दाखवले. या घटनेमुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. खुद्द भाऊसो कांबळे यांनी आम्हाला जगण्याचा तरी मूलभूत अधिकार आहे की नाही असा संताप व्यक्त केला. यावेळी बसपचे जिल्हा प्रभारी संदीप शिंदे यांनी जिवंत व्यक्तीला मृत घोषित करणाऱया संबंधित वैद्यकीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला पक्षाचे जिल्हा झोन प्रभारी उदय घाटगे, अमर शिंदे, गौतम कांबळे, मारुतीकसबे, रविंद्र कांबळे उपस्थित होते.