सांगरुळ / प्रतिनिधी
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारकडून सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी आंदोलक शिक्षक व कर्मचारी यांना दिला. मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार जयंत आसगावकर आणि आमदार विक्रम काळे यांनी दुसऱ्यांदा भेट देऊन पाठिंबा दर्शविला व लवकरच शासन स्तरावर याबाबत चांगला निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार आसगावकर म्हणाले, काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनपासून वंचित रहावे लागले. सम्यक समितीच्या अहवालाचे काम अंतिम टप्यात आले आहे. या समितीकडून सकारात्मक अहवाल तयार होईल, असा माझा विश्वास आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. भविष्यात हा प्रश्न नक्कीच सुटेल. या आंदोलनाची शासन स्तरावर दखल घेतली आहे. ही लढाई रस्त्यावरची असून आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत.
यावेळी बोलताना आ. विक्रम काळे म्हणाले, गेल्या अधिवेशनापासून आमचा जुनी पेन्शनसाठी पाठपुरावा सुरू आहे. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सरकारला भाग पाडू. पेन्शन ही प्रत्येकांच्या जीवनाशी, कुटुंबाशी निगडित आहे. तुमच्या व्यथा आम्हाला माहित आहे, हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. यावेळी जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीच्या अध्यक्षा संगीताताई शिंदे, सरचिटणीस दिलीप डोंगरे, सचिव महेंद्र हिंगे, सुदेश जाधव, श्रीधर गोंधळी, खंडेराव जगदाळे आदी उपस्थित होते.