वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय ज्युडोपटू दीपांशू बलयन उत्तेजक चांचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर नाडाच्या शिस्तपालन समितीने 22 महिन्यांच्या कालावधीसाठी बंदी घातल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली.
कनिष्ठांच्या आशियाई ज्युडो स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघ निवड करण्याकरिता गेल्यावर्षीच्या जूनमध्ये बलयनची भोपाळ येथे झालेल्या निवड चांचणी स्पर्धेवेळी उत्तेजक चांचणी घेण्यात आली होती. त्याच्या मूत्रल नमुन्यामध्ये नाडाने निर्बंध घातलेल्या ‘फ्युरोसिमेंडी’ हे द्रव आढळले होते. बलयनने ज्युडो चांचणी स्पर्धेत 90 किलो वजन गटात प्रथम स्थान घेत राष्ट्रीय संघात स्थान मिळविले होते. बलयनचा हा उत्तेजक गुन्हा आंतरराष्ट्रीय असल्याने नाडाच्या उत्तेजक विरोधी शिस्तपालन समितीने कारवाई केली असून त्याच्या शिक्षेमध्ये थोडी शिथिलता करण्याचा निर्णय घेतला आहे. नाडाच्या उत्तेजक नियमानुसार त्याच्यावर चार वर्षांच्या कालावधीसाठी बंदीची तरतूद आहे पण नाडाने 22 महिन्यांच्या कालावधीसाठी बंदीचा निर्णय घेतला आहे. या कालावधीमध्ये आणखी दोन माहिन्यांची कपात करण्यात आली कारण नाडाकडून पाठविण्यात आलेली नोटीस बलियानला वेळेत मिळू शकली नाही. बलयनच्या बंदी कालावधीला 17 ऑक्टोबर 2019 पासून प्रारंभ झाला आहे. नाडाच्या या निर्णयाविरूद्ध बलयनला क्रीडा लवादाकडे दाद मागण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.