इचलकरंजी/प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2020 ते 2021 च्या अर्थसंकल्पात टेक्निकल टेक्स्टाईलच्या वाढीसाठी “नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशन” प्रस्तावित करून त्यासाठी 1480 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली. हा उपक्रम वस्त्रोद्योगाच्या भवितव्यासाठी फायदेशीर असून यामुळे भारत जागतिक वस्त्रोद्योगाचे नेतृत्व करेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.
हाळवणकर म्हणाले की, वस्त्रोद्योग विभागासाठी 3377 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 761 कोटी टफ योजनेसाठी तरतूद केले आहेत. टेक्निकल टेक्स्टाईल क्षेत्रात देशाला मोठी संधी आहे. भारत दरवर्षी 16 अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीच्या टेक्निकल टेक्स्टाईलचे आयात करतो. टेक्निकल टेक्स्टाईलचे उत्पादन वाढवून जगात या क्षेत्रात भारताला मोठी संधी मिळवून देण्यासाठी 2020 ते 2024 या चार वर्षात नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशन राबवण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या योजनेचे सविस्तर तपशील आल्यानंतर इचलकरंजी सारख्या विकेंद्रित क्षेत्रात सुद्धा टेक्निकल टेक्स्टाईल वाढीसाठी प्रयत्न केले जातील.
पॉलिस्टरच्या उत्पादनासाठी आवश्यक कच्चा घटक असलेला पिटीए या केमिकल वर अँटी डंपिंग ड्युटी हटविण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचासुद्धा सकारात्मक परिणाम भारतातील वस्त्र निर्यातीवर होणार आहे. त्याचबरोबर स्पर्धात्मक उदरात कच्चामाल उपलब्ध करून देण्याच्या घोषणेमुळे मेक इन इंडियाला बळ मिळेल.
परदेशात मालाची निर्यात करणाऱ्या उद्योजकांसाठी कमी प्रीमियम मध्ये वाढीव विमा संरक्षण प्रदान करण्यासाठी “निर्यात ऋण विकास योजना” (निर्विक) योजना जाहीर करण्यात आली आहे. एक्सपोर्ट क्रेडीट इन्शुरन्स स्कीम या योजनेतून पूर्वी 60 टक्के भरपाई देण्यात येत होती. ती वाढवून 90 टक्के पर्यंत करण्यात आली आहे. याचा मोठा फायदा वस्त्रोद्योग क्षेत्रातील निर्यातदारांना सुद्धा होणार आहे याबद्दल हळवणकर यांनी अर्थमंत्री सीतारमण यांचे आभार मानले आहेत