चाहत्यांशिवाय पहिलीच ऑलिम्पिक : 68 हजार क्षमतेच्या स्टेडियमवर फक्त 1 हजार जणांना प्रवेश, कोरोनाचे सावट कायम
टोकियो / वृत्तसंस्था
इतिहासातील सर्वात अनोख्या ठरणाऱया टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आज होत आहे. मात्र, विविध इव्हेंट्सप्रमाणेच उद्घाटन सोहळय़ाला देखील प्रेक्षकांना हजर राहता येणार नाही. बंदिस्त स्टेडियममध्ये व मोकळय़ा गॅलरीसमोर उद्घाटन सोहळय़ाची औपचारिकता पार पाडली जाईल. यंदाची ऑलिम्पिक दि. 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत प्रेक्षकांविना खेळवली जाणार आहे.
68 हजार प्रेक्षकक्षमतेच्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये केवळ 1 हजार निमंत्रितांना प्रवेश दिला जाईल. एरवी कोणत्याही ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळय़ात ऑलिम्पिकचा प्राचीन इतिहास व सांस्कृतिक, ऐतिहासिक घडामोडींना आवर्जून स्थान दिले जाते. शिवाय, सहभागी सर्व संघ शाही पथसंचलनात सहभागी होतात. मात्र, यंदा उद्घाटन सोहळा औपचारिक असेल व त्यात प्रत्येक पथकातील मोजक्या ऍथलिट, पदाधिकाऱयांचा सहभाग असणार आहे.
आजच्या उद्घाटन सोहळय़ात जपानचे सम्राट नारुहितो अध्यक्षस्थान भूषवतील. शिवाय, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बिडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन प्रमुख पाहुणे असणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकचा आतापर्यंतचा प्रवास बराच चढउतारांचा राहिला असून उद्घाटन सोहळय़ाला 24 तासांचा अवधी बाकी असतानाच या सोहळय़ाचे मुख्य संचालक केन्टारो काबायशी यांना बडतर्फ केले गेले आहे.
क्रीडाज्योतीचा जगप्रवास हा ऑलिम्पिक जनजागृतीचा अविभाज्य घटक ठरत आला आहे. पण, यंदा याला देखील झळ बसली आहे. 16 महिन्यांपूर्वी क्रीडाज्योतीचा प्रवास सुरु झाला. मात्र, त्यानंतर काहीच दिवसात ऑलिम्पिक वर्षभराने लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला होता. त्यानंतर या रिलेचे बरेच टप्पे चाहत्यांना दूर ठेवत पार पाडले गेले.
- ऑलिम्पिकचा कालावधी : 17 दिवस
- सहभागी देश : 204
- सहभागी ऍथलिट : 11261
- इव्हेंट्स : 33 क्रीडा प्रकारात 339
- ऑलिम्पिकचा खर्च : 1540 कोटी डॉलर्स
- सर्वात मोठे पथक : 613 ऍथलिट्स (अमेरिका)